अहमदनगर : जिल्ह्यातील अनेक UIDAI केंद्रांवर ५ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड बायोमेट्रिक अपडेटसाठी नियमांचे उल्लंघन करून १०० रुपये किंवा त्याहून अधिक अवाजवी शुल्क आकारले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रत्यक्षात, ५ ते ७ वर्षे आणि १५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांचे अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट पूर्णपणे मोफत असणे आवश्यक आहे.
या गंभीर प्रकाराबद्दल वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी जिल्ह्याधिकारी पंकज आशिया यांना निवेदन दिले आहे. यामध्ये त्यांनी सर्व UIDAI केंद्रांना शासन निर्णयानुसार मोफत अपडेटची कार्यवाही करण्याचे तातडीने आदेश देण्याची मागणी केली आहे.
मुख्य मागण्या :
१. संबंधित सर्व UIDAI सेंटरला शासनाच्या नियमानुसार कार्यवाही करण्याचे आणि ५ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक अपडेट मोफत करण्याचे आदेश द्यावेत.
२. विद्यार्थ्यांकडून पैशांची अवाजवी वसुली करणाऱ्या केंद्र चालकांवर कायदेशीर कारवाई करावी.
३. दोषी केंद्र चालकांचा परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा.
नागरिकांना आवाहन –
जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी या संदर्भात नागरिकांना महत्वाचे आवाहन केले आहे. जर कोणी ५ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांकडून आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे आकारत असेल, तर त्याची पावतीसह तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय येथे करावी, असे त्यांनी म्हटले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्यासह जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने, भिंगार शहराध्यक्ष राजीव भिंगारदिवे, जिल्हा संघटक सुधीर ठोंबे, शहराध्यक्ष हनीफ शेख, जिल्हा सल्लागार जे डी शिरसाठ, नगर तालुकाध्यक्ष रविकिरण जाधव, युवा शहराध्यक्ष ॲड. योगेश गुंजाळ, प्रवीण ओरे, गणेश राऊत, सुरेश पानपाटील, फिरोज पठाण, बुद्धभूषण भिवसने, अजित कुऱ्हाडे, संकेत शिंदे, कौशिक गाडे, देविदास भालेराव, मनोज साळवे, गोविंद आठवले, शिवशंकर कठमोर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.