अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आयोजित भव्य धम्म मेळाव्यात वंचित बहुजन युवा आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विविध ज्वलंत प्रश्नांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना धारेवर धरले. महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापनावरून काँग्रेस-भाजप या दोन्ही पक्षांना जबाबदार धरण्यात आले, तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि हमीभावासाठी ‘वंचित’ पक्ष आपला लढा अधिक तीव्र करेल, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.
‘महाबोधी महाविहाराच्या दुरावस्थेस काँग्रेस-भाजप दोन्ही जबाबदार’
वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी यावेळी बोलताना महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापनाचा मुद्दा उपस्थित केला. निवडणुकीत मते मिळवण्यासाठी संविधानाचा फोटो दाखवणाऱ्यांना त्यांनी स्पष्ट शब्दात सुनावले. बौद्ध अनुयायांना १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा दिली, याचा उल्लेख करत पातोडे म्हणाले की, १९४९ साली काँग्रेस पक्षाने महाबोधी महाविहार ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यात दिला.
आजपर्यंत १९ मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचे झाले, पण त्यांनी कधीही महाबोधी महाविहार मुक्त केला नाही, असे म्हणत त्यांनी महाविहाराच्या सद्यस्थितीला काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष जबाबदार असल्याचे ठामपणे सांगितले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधले. महाराष्ट्रात शेतीमालाला योग्य भाव मिळत नसताना व्यापाऱ्यांना मदत केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
ज्या पक्षांना शेतकऱ्यांनी मते दिली, ते सर्व आज गप्प आहेत. सरकार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करत नाही, ओला दुष्काळ जाहीर करत नाही, असे पुंडकर म्हणाले. या देशातील व्यापाऱ्यांचे हजारो कोटींचे कर्ज माफ केले जाते, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जात नाही, या विषमतेवर त्यांनी बोट ठेवले.
डॉ. पुंडकर यांनी शेतकऱ्यांनी आपली दिशा स्पष्ट करावी असे आवाहन केले. आता शेतकऱ्यांनी मतदान फक्त आपल्या शेतमालाला हमीभाव देण्याचे, कर्जमाफीचे वचन देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला करावे. आम्ही शेतकऱ्यांसाठी आमचा लढा देत राहूच! असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.