वाशी : शहरातील रस्ते, पाइपलाइन, नाल्या तसेच विविध विकासकामांच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलन तर्फे वाशी नगरपंचायत मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात वार्ड क्रमांक १ ते ५ मधील रस्ते, नाल्या, सार्वजनिक नळ, व्यायामशाळा, वाचनालय, बौद्ध विहार यांसह एकूण १५ मागण्यांचा समावेश आहे. विशेषतः वार्ड क्रमांक ४ मधील टेक्निकल शाळेजवळील रस्ता व पाइपलाइन आणि वार्ड क्रमांक ५ मध्ये वाचनालय व व्यायामशाळेसाठी निधीची मागणी करण्यात आली आहे.
या विकासकामांसाठी एक कोटी रुपयांचा निधी राखीव असूनही कामे रखडल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या मागण्यांना तात्काळ मान्यता न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलन तर्फे देण्यात आला आहे.
नगरपंचायतचे मुख्याधिकारी शिंदे यांनी निवेदन स्विकारले असून तात्काळ उपाययोजना करण्यासाठी लेखी सूचना केल्याचे सांगितले जाते.
या निवेदनावर सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य जयपाल सुकाळे, प्रशांत सुकाळे, अनिकेत बनसोडे, रोहन गायकवाड, सुमित गायकवाड, उत्कर्ष बनसोडे, शिद्धोधन सुकाळे, रुपेश सुकाळे, शैलेश गायकवाड आदींच्या सह्या आहेत.