प्रा. भारत सिरसाट
देशात सध्या धर्मांत शक्तींच्या हाती राजसत्ता असल्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. आरएसएसने वारंवार इथल्या संस्कृतीवर हल्ला करून त्यांना अभिप्रेत असलेली संस्कृती जनतेवर लादण्याचे ग्राऊंड लेवलवर काम केले आहे. त्यामध्ये ते यशस्वी झाल्यामुळेच भाजपा केंद्रात व राज्यात सत्तेत आहे. याचाच अर्थ जो पर्यंत आपण आपली संस्कृती आपला सांस्कृती लढा मजबुत करीत नाही, आपली प्रतिके जोपासत नाही तोपर्यंत आपण राजसत्तेपर्यंत पोहचू शकणार नाही. बुद्ध कालापासून या देशामध्ये समतावादी विचारसरणी व विषमतावादी विचारसरणी यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे, या युद्धाचा सामना तथागत बुद्धांपासून सम्राट अशोक, महात्मा फुले, शाहु महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत पुरोगामी विचाराचा पुरस्कार करणार्या सर्व विभूतींना करावा लागला, हा इतिहास आहे. बुद्धापासून सुरू झालेला संघर्ष आजतागायत संपलेला नाही, तो अव्याहतपणे सुरूच आहे.
हा संघर्ष सुरू असण्याचे एकमेव कारण म्हणजे आपण आपला सांस्कृतिक वारसा जोपासू शकलो नाही, आपला सांस्कृतिक लढा बळकट करू शकलो नाही, आपल्या प्रतिकांचे जतन करू शकलो नाही, हे पहिल्यांदा आपण स्विकारूया. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वानानंतर सूर्यपूत्र भय्यासाहेब आंबेडकर यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातुन देशभरात जी चळवळ उभी केली ती चळवळ म्हणजे दुसरे तीसरे काही नसून आपली प्रतिके उभारून आपली संस्कृती रूजविण्याचा, सांस्कृतिक चळवळ बळकट करण्याचा बौद्ध् संस्कृतिच्या दृष्टीने सम्राट अशोक यांच्यानंतर यशस्वी प्रयत्न ठरला.
सम्राट अशोक यांनी ज्या पद्धतीने 84 हजार बुद्ध विहारांची निर्मिती करून या देशामध्येच नव्हे तर जगामध्ये बुद्ध टिकवून ठेवला, बौद्ध संस्कृती टिकवून ठेवली त्याच पद्धतीने भय्यासाहेब आंबेडकरांनी गावागावात बुद्ध-फुले-आंबेडकर यांचे पुतळे उभारा, असे आवाहन करून व स्वता महु ते मुंबई अशी भिमज्योत काढुन लोकवर्गणीतुन चैत्यभूमीची निर्मिती करून त्याची सुरूवात केली. म्हणजेच आज आपल्या घरामध्ये म.फलेंचा, शाहु महाराज, शिवाजी महाराज, संत कबीर आणि इतर महापुरूषांचा जो फोटो दिसतो आहे तो संस्कृती टिकवण्याचा व रूजविण्याचा विचार आहे आणि हा विचार पेरण्याचे काम भय्यासाहेब आंबेडकर यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातुन देशभरात केले आहे.
धर्मांतर झाले परंतु आम्ही खर्या अर्थाने बौद्ध संस्कृतीशी एकरूप झालो होतो का तर नाही, आम्हाला धम्मं समजला होता का तर नाही, कारण रक्ताचा एकही थेंब न सांडवता बाबासाहेबांनी जी क्रांती केली होती त्या क्रांतीकारी हाकेला ओ देत गावखेड्यापासून ते शहरापर्यंतचा सर्व समाज केवळ बाबासाहेबांनी सांगितल्यामुळे बौद्ध झाला होता, बौद्ध झाल्यानंतर अल्पावधीतच बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले, त्यामुळे बौद्ध विचार, बौद्ध संस्कृती, बौद्धांची आचारसंहिता या सर्व बाबी भय्यासाहेब आंबेडकरांनी हेरून नवसंस्कृतीच्या प्रचार-प्रसाराचा ध्यास घेतला त्याचा परिणाम आज आपल्यासमोर आहे. धर्मांतरापूर्वी भारतामध्ये असलेली बौद्धांची लोकसंख्या ही 0.05 टक्के एवढी होती, भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर भारतामध्ये ती केवळ 0.03 टक्के एवढी शिल्लक राहीली होती.
त्यामुळे आपली भगवान बुद्धांचा देश व बौद्धांचा देश म्हणुन असलेली जागतीक ओळख पुसून जाण्याची भीती लक्षात घेत भय्यासाहेब आंबेडकर यांनी गावागावामध्ये धर्मांतराचे सोहळे आयोजित केले, दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी असे सूत्र मांडले ज्यामुळे, स्मारके उभी केली ज्यामुळे आपली सांस्कृतिक लढाई तर भय्यासाहेबांनी लढलीच त्याच बरोबर ते राजकीयदृष्ट्याही रिपब्लिकन पक्षाला त्याची मदत झाली व 1952, 1957, 1962, 1967 च्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला यश मिळवता आले.
याचे आपण बारकाईने निरिक्षण केले असता आपल्या असे लक्षात येईल की, भय्यासाहेबांनी राजकारणात सक्रिय राहण्यापेक्षा भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातुन देशभरात भ्रमण केले, केवळ भ्रमणच केले नाही तर आपली सांस्कृतिक चळवळ, धार्मिक चळवळ गतिमान करण्याचे काम केले. आंबेडकरवाद लोकांना गावागावात जावून समजावून सांगितला, बुद्ध वंदना, बुद्ध तत्वज्ञानाची पेरणी केली, लोकांना धम्माप्रती जागृत केले. त्यामुळे एक सुसंस्कृत, स्वाभीमानी व विचारधारेशी एकनिष्ठ असा समाज निर्माण होऊ लागला आपल्या स्वाभीमानाशी, आंबेडकरी विचारधारेशी तो एकनिष्ठ झाल्यामुळे आपसूकच त्याचा फायदा त्यावेळी रिपब्लिकन पक्षाला झाला व रिपब्लिकन पक्षाला राजकीयदृष्ट्या मोठे यश त्यावेळी मिळाले होते.
भय्यासाहेबांच्या संदर्भाने आज अनेक साहित्यिक, विचारवंत असे म्हणतात की, रिपब्लिकन पक्षाने व तत्कालिन पुढार्यांनी भय्यासाहेबांना उपेक्षित ठेवले हे जरी सत्य असले तरी भय्यासाहेब हे बाबासाहेबांचे रक्ताचे व विचाराचे वारसदार होते, त्यांनी रस्त्यावर व सभागृहातही लढा दिला. केवळ लढाच दिला नाही तर त्यांनी एकुण आंबेडकरी चळवळ गतिमान होण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. भय्यासाहेबांच्या निधनानंतर मात्र या चळवळीला दिशा देण्यासाठी व सांस्कृतिक चळवळीला उभारी देण्यासाठी व्यापक स्वरूपाचा पुढाकार न घेता आल्यामुळे रिपब्लिकन पक्षाची वाताहत झाली, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
केवळ संघटना वाढविल्याने, कार्यकर्त्यांच्या नेमणूका केल्याने, गावागावात शाखा निर्माण केल्याने, एखाद दोन जयंती-पुण्यतिथी साजरी, मोठे-मोठे सोहळे आयोजित केल्याने सांस्कृतिक चळवळ बळकट होऊ शकणार नाही. आज आरएसएस नंतर भारतीय बौद्ध महासभा ही देशातील सर्वांत मोठी संघटना आहे. दोन्ही संघटनांच्या विचारधारा वेगळ्या असल्या तरी आजच्या दिवसाच्या निमित्ताने त्याची तुलना करणे गरजेचे आहे.
आज संघाला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांनी या 100 वर्षात या देशामध्ये एक हाती सत्ता मिळविण्यापर्यंत मजल मारली आहे, आपण आज सत्तरीपर्यंत येवून पोहोचलो आहोत, परंतु एकाही जिल्ह्यामध्ये एकहाती सत्ता निर्माण करण्यासारखे वातावरण तयार करू शकलो नाही, ही प्रचंड मोठी शोकांतीका आहे. राजकीय पक्ष आणि धार्मिक संघटन ह्या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत, राजकीय पक्षाची कार्ये व धोरणी वेगळी व धार्मिक संघटनेची, संस्थांची कार्ये व धोरणी वेगळी असतात हे आपल्याला समजून घेता आले पाहिजे होते परंतु आपण याउलट राजकारण आणि धर्म् यांना एका सूत्रात बांधुन काम केल्यामुळे त्याचा कुठलाही निष्कर्ष आजपर्यंत मिळू शकला नाही. आपल्याला पहिल्यांदा सांस्कृतिक चळवळ उभी करण्याची व त्याचा विस्तार करण्याची गरज आहे. यासाठी निस्वार्थीपणाने काम करणार्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण करावी लागणार आहे.
निस्वार्थी म्हणजेच ज्याच्या कोणत्याही राजकीय आकांक्षा नाहीत असे. भय्यासाहेब आंबेडकरांनंतर बाळासाहेब आंबेडकरांनी सम्यक समाज आंदोलन, भारतीय रिपब्लिकन पक्ष, बहुजन महासंघ, फुले-आंबेडकर विद्वत सभा, भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, बहुजन कामगार संघ, अशा नानाविध पातळ्यांवर संघटना उभ्या करण्याचा महत्तम प्रयास केला परंतु आपली धार्मिक स्थिती, आपली सांस्कृतिक चळवळ कमी पडत असल्यामुळे आणि प्रत्येकांच्या मनामध्ये राजकीय लालसा असल्यामुळे त्या-त्या पातळीवरील नेमणूक केलेल्या कार्यकर्ता, पदाधिकार्यांनी ईमाने – ईतबारे आपली जबाबदारी पार पाडली नाही त्याचा प्रचंड मोठा फटका बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाला बसला व आजही त्या परिस्थितीमध्ये बदल झाला आहे, असे चित्र दिसत नाही. ही परिस्थिती आपण बदलणार आहोत की नाही, आज कुणीही उठसुठ बाळासाहेबांच्या राजकारणावर बोट ठेवण्याच्या प्रयत्न करीत आहे, याला जबाबदार कोण आहेत, याचा आपण पहिल्यांदा शोध घेणे गरजेचे आहे.
बाळासाहेबांनी महत्तम उभ्या केलेल्या या चळवळीला उभारी देणारे निस्वार्थी कार्यकर्ते आम्ही मिळवून देवू शकलो नाही, तयार करू शकलो नाही कारण आम्ही धार्मिकदृस्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या आमची चळवळ आहे त्याच परिस्थितीत ठेवली आहे, त्याचा विस्तार प्रसार आणि प्रचार करण्यास आम्ही कमी पडलो आहोत. आज धम्मदीक्षेच्या 69 व्या वर्षी तरी आम्ही या गोष्टीकडे गांभीर्याने पाहणार आहोत का, जेणेकरून बाळासाहेबांनी उभ्या केलेल्या या चळवळीला उभारी मिळू शकेल.
अध्यक्ष, सूयपूत्र भय्यासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाण, औरंगाबाद मो. नं. 9421308101