मध्यप्रदेश : मध्यप्रदेशातील पन्ना जिल्ह्यामध्ये अवैध खाणकामाच्या एका महत्त्वपूर्ण प्रकरणात काँग्रेस पक्षाचे माजी महामंत्री आणि डायमंड स्टोन क्रशरचे मालक श्रीकांत दीक्षित यांना कलेक्टर न्यायालयाने तब्बल १ अब्ज, २४ कोटी, ५५ लाख, ८५ हजार ६०० रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे. हा निर्णय अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा संदेश देणारा मानला जात आहे.
नेमका आरोप काय?
श्रीकांत दीक्षित यांच्यावर पन्ना जिल्ह्यातील गुनौर तालुक्यातल्या बिलघाडी परिसरात परवानगीपेक्षा कितीतरी अधिक पटीने अवैध दगड खाणीचे उत्खनन केल्याचा आरोप होता. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार आल्यानंतर खनिज प्रशासन, महसूल आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या संयुक्त समितीने चौकशी केली.
चौकशीत असे आढळले की, दीक्षित यांनी केवळ ९९,३०० घन मीटरची रॉयल्टी शासनाकडे जमा केली होती. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी २ लाख ७२ हजार २९८ घन मीटरपेक्षा अधिक उत्खनन केले होते. म्हणजेच, परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा ते कितीतरी जास्त जागेवर खाणकाम करत होते. उपलब्ध पुरावे आणि चौकशी अहवालाच्या आधारे कलेक्टर न्यायालयाने त्यांना ही विक्रमी दंडाची रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायालयाचे निर्देश आणि कारवाई
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, दीक्षित यांच्याकडून नियमानुसार दंडाची संपूर्ण रक्कम वसूल करून ती सरकारी खजिन्यात जमा करावी असे निर्देश खनिज विभागाच्या उपसंचालकांना देण्यात आले आहेत.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने हेही नमूद केले की, आरोप झाल्यावर दीक्षित यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती आणि उत्तर देण्यासाठी पुरेसा वेळही दिला होता, तरीही त्यांनी वारंवार हे प्रकरण प्रलंबित ठेवण्याचा प्रयत्न केला.