अकोला : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने विविध शाखांच्या अभ्यासक्रमासाठी परीक्षा फी वाढविण्याचा घेतलेला निर्णय मागे घेण्याची मागणी वंचित बहुजन युवा आघाडी अकोला तर्फे करण्यात आली.
कुलगुरू अकोला येथील शिवाजी महाविद्यालयात आले असता युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना घेराव घालून निवेदन सादर केले. अवाजवी परीक्षा फी वाढीमुळे गोरगरीब शेतकरी, कष्टकरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
फी वाढीमुळे अनेक विद्यार्थी पैशाअभावी परीक्षेला बसू शकणार नाहीत आणि याला विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहील, असे स्पष्ट करण्यात आले. तसेच शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून प्रवेशित विद्यार्थ्यांच्या नामांकनासाठीची अंतिम तारीख वाढविण्याची मागणीही करण्यात आली.
ही मागणी पूर्ण न झाल्यास विद्यार्थ्यांच्या हितासाठी आंदोलन उभारण्याचा इशारा प्रदेश महासचिव राजेंद्र भाऊ पातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा युवक अध्यक्ष श्रीकांत घोघरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर यांच्या नेतृत्वात देण्यात आला.
यावेळी शहर अध्यक्ष वैभव खडसे, अभिजित नितवाने, साहिल बोदडे, राकेश वाघमारे, आर्यन वानखेडे, सतीश सावंत, अक्षय अवरसमोल यांच्यासह पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.