चाकण : चाकण एमआयडीसीमधील उद्योजकांवर करांच्या वाढीचा बोजा पडला आहे. यामुळे विविध अडचणींनी ग्रासलेल्या उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज (FCI) या अन्यायकारक कर वाढीविरोधात आवाज उठवणार असल्याचे सांगितले जात आहे.
आशियातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकण एमआयडीसीमध्ये सुमारे 750 हून अधिक लहान-मोठे उद्योग आहेत. यामध्ये फोक्सवॅगन, बजाज ऑटो, मर्सिडीस-बेंझ, आणि युंदाई अशा अनेक मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. मात्र, या वसाहतीत पायाभूत सुविधांची वानवा असून, रस्ते, वाहतूक कोंडी, कचरा आणि पाण्याची समस्या गंभीर आहे.
अशा परिस्थितीत एमआयडीसीने सेवाकर, पाणीपट्टी, आणि रस्ताकर यांसारख्या सर्व करांमध्ये मोठी वाढ केल्याने उद्योजकांसमोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. यामुळे उद्योगांच्या आर्थिक गणितावर नकारात्मक परिणाम होणार असून, आधीच अडचणीत असलेले उद्योग यामुळे आणखी संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.