मुंबई : बुद्धगया महाबोधी महाविहार आंदोलनाचे प्रणेते भंते अनागारिक धम्मपाल, पेरियार स्वामी जयंती आणि भैय्यासाहेब आंबेडकर स्मृतीदिनाच्या औचित्याने १७ सप्टेंबर २०२५ रोजी देशव्यापी जनआक्रोश आंदोलन होणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर करणार आहेत.
आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून संपूर्ण देशभर राज्य मंत्रालये व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढले जाणार आहेत. यामधून केंद्र आणि राज्य सरकारकडे तीन प्रमुख मागण्या ठेवण्यात येणार आहेत.
आंदोलनाच्या प्रमुख मागण्या :
- बुद्धगया महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांकडे सोपवावे. सध्या अस्तित्वात असलेला बोधगया मंदिर अधिनियम १९४९ हा संविधानाच्या अनुच्छेद २५, २६ आणि १३ च्या विरोधी असल्याचे स्पष्ट करून, महाबोधी महाविहार संपूर्णपणे बौद्ध समाजाकडे द्यावा, तसेच डॉ. भीमराव य. आंबेडकर यांना व्यवस्थापनात कायमस्वरूपी स्थान द्यावे.
- महू जन्मभूमीवरील स्मारकाचे व्यवस्थापन विचारधारेनुसार करावे. महू (मध्यप्रदेश) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मस्थळी उभारलेले स्मारक सध्या त्यांच्या विचारधारेच्या विरोधात चालवले जात असल्याचा आरोप करून, त्याचे व्यवस्थापन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया कडे सोपवावे अशी मागणी आहे.
- नागपूर दीक्षाभूमीवरील बेकायदेशीर कब्जा हटवावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मिळालेल्या सरकारी जमिनीवर उभारलेल्या दीक्षाभूमीचे विद्रूपीकरण थांबवून, त्याचे व्यवस्थापन डॉ. भीमराव य. आंबेडकर व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्याकडे द्यावे.
या मागण्यांसंदर्भात देशातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, तसेच राष्ट्रपती व पंतप्रधान यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी कळवले.
मुंबईत या आंदोलनाचा केंद्रबिंदू असेल. आझाद मैदान, मुंबई येथे सकाळी १०.३० वाजता मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्यांचा संयुक्त आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चाचे नेतृत्व डॉ. भीमराव य. आंबेडकर स्वतः करणार असून, मोठ्या संख्येने अनुयायी सहभागी होणार असल्याची माहिती दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व समता सैनिक दलाचे केंद्रीय कार्यालय प्रमुख ॲड. एस. के. भंडारे यांनी दिली. ॲड. भंडारे यांनी सर्व बौद्ध-आंबेडकरी समाज संघटनांना, संस्थांना आणि अनुयायांना आवाहन केले आहे की, या अस्मितेच्या लढ्यात प्रचंड संख्येने सहभागी व्हावे.