कर्जत : जेष्ठ नागरिकांच्या विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी कर्जत येथे आज मोठा मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघ (फेसकॉम, मुंबई), प्रादेशिक विभाग अहिल्यानगर, वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र जेष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे नेते, नगरसेवक ॲड. डॉ. अरुण जाधव, शब्बीर पठाण, शशिकांत पाटील, सोमनाथ भैलुमे आणि दत्ता भालेराव यांनी केले. जेष्ठ नागरिकांच्या 19 विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने वृद्ध महिला, विधवा, परित्यक्ता, एकल लोककलावंत आणि जेष्ठ नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. मराठी मुलांची शाळा ते कर्जत तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. सुमारे 500 ते 600 नागरिकांनी यात सहभाग घेतला.
मोर्चा दरम्यान बोलताना ॲड. डॉ. अरुण आबा जाधव यांनी सांगितले की, आमचा लढा संविधानिक मार्गाने आहे. मात्र लाभार्थी तहसील कार्यालयात येतात तेव्हा तहसीलदार अनेकदा अनुपस्थित असतात. संजय गांधी निराधार योजनेच्या बैठका नियमित का होत नाहीत?, तसेच जन्मदाखले वेळेवर का मिळत नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मोर्चेकऱ्यांनी जेष्ठ विधवा महिलांना मिळणारे मानधन 1500 रुपयांवरून 5000 रुपये करावे, घरकुल योजना मिळावी, तसेच रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र आणि आधार कार्ड तातडीने उपलब्ध करून द्यावीत, अशा प्रमुख मागण्या मांडल्या.
यावेळी शब्बीर पठाण यांनी इशारा देत सांगितले की, निवेदनातील 19 मागण्या पूर्ण न झाल्यास कर्जत तहसील कार्यालयात तीव्र आंदोलन छेडले जाईल. तसेच कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार, विधान परिषद सभापती राम शिंदे आणि खासदार निलेश लंके यांनी या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा त्यांच्या निवासस्थानांसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. मोर्च्यानंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी तुकाराम पवार, चांगदेव सरोदे, संतोष चव्हाण यांच्यासह मोठ्या कार्यकर्ते उपस्थित होते.




