ॲड. प्रकाश आंबेडकर : उस्मानाबाद मतदारसंघात प्रचार सभा
उस्मानाबाद : साडे सहा हजार कोटी रुपये पंतप्रधान कार्यालयाने वसूल केले आहेत. मी स्वतःचे काहीच बोलत नाही. त्यांनी मला अटक करावी, असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उस्मानाबाद येथे दिले. ते वंचित बहुजन आघाडीचे उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांच्या प्रचार सभेत बोलत होते.
१९८० पासून ते २०२४ अशा काळात इंदिरा गांधी ते मोदी असे सगळे पंतप्रधान पाहिले. यामध्ये पंतप्रधानाचे कार्यालय हे मानवतेचे कार्यालय आणि लोकांना न्याय देणारे भीतीमुक्त कार्यालय असा कारभार मी पाहत आलो आहे. मागच्या 10 वर्षांत मानवतेचा कार्यकाळ राहिला नसल्याची खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोघांना भिडवण्याचे षडयंत्र येथे झाले. पण वंचित बहुजन आघाडीने शांततेची भूमिका घेतल्याने सलोखा कायम राहिला आहे. इथे एकही वर्ग नाही जो म्हणेल तो सुखाने आणि शांतीने राहत आहे. दिल्लीत आंदोलन करणारे शेतकरी काय म्हणत होते. दर जूनमध्ये हमीभाव जाहीर करता पण हमीभाव शेतकऱ्यांना मिळत नाही. म्हणून ते शेतकरी लाखोंच्या संख्येने हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळ्यामध्ये दिल्लीत आंदोलनाला बसले होते.
तुम्हाला तुमचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल, तर भाऊसाहेब आंधळकर यांना मतदान द्या आणि स्वातंत्र्य गमवायचे असेल, तर भाजपला मतदान द्या. असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
भाजपला सत्तेतून खाली खेचा
भाजप तुम्हाला गुलाम करत आहे, लोकशाही संपवून त्यांना हुकूमशाही आणायची आहे. त्यासाठी पहिल्यांदा तुमचा मेंदू त्यांच्या ताब्यात आहे का ? हे तपासण्याचे काम चालू आहे. त्यांना सत्तेतून खाली खेचलं पाहिजे. असेही त्यांनी म्हटले. कल्याणकारी राज्य हवे होते, इथे वसुलीचे राज्य सुरू झाले आहे इथे कल्याणकारी राज्य पाहिजे होते, ते न राहता लोकांना त्रास देणारे वसुलीचे राज्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.