मुंबईतील उपनगरीय लोकल रेल्वेचा वापर करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी गेली अनेक वर्षे ‘जीवनवाहिनी’ ठरलेल्या लोकलने मागील १० वर्षांत तब्बल २६,000 जणांचा बळी घेतला आहे. यामध्ये ट्रॅक ओलांडताना, चढताना-उतरताना, अथवा लोकलमधून पडून झालेल्या मृत्यूंचा समावेश आहे. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने मृत्यू होऊनही रेल्वे प्रशासनाने फक्त १४०० मृत प्रवाशांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली आहे.
या १४०० केसेसमध्ये एकूण १०३ कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली असून, उर्वरित हजारो कुटुंबांना कोणतीही मदत मिळालेली नाही. यावरून रेल्वेच्या अपुऱ्या सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, अपघातांनंतर जबाबदारी झटकण्याच्या प्रवृत्तीवरही गंभीर चर्चा सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे दरवर्षी सरासरी दोन ते तीन हजार जण मुंबईतील लोकल अपघातांमध्ये प्राण गमावत आहेत, आणि ही संख्या अजूनही कमी होताना दिसत नाही. सुरक्षा, गेट्स, पूल, जनजागृती आणि सुसज्ज व्यवस्था यांची तीव्र गरज असल्याचे स्पष्ट होते.