अकोला – अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रारूप प्रभाग रचनेवर वंचित बहुजन आघाडीने आक्षेप नोंदवला आहे. दिनांक 14 जुलै 2025 रोजी जाहीर झालेल्या या प्रारूप रचनेमध्ये चिखलगाव, आगर आणि बाभुळगाव जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत अनुसूचित जाती व जमातींची लोकसंख्या चुकीची दर्शवण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अकोला तालुक्यातील कार्यकर्ते प्रदीप पळसपगार यांनी तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यांनी सादर केलेल्या हरकतीनुसार, चुकीच्या लोकसंख्येच्या नोंदीमुळे प्रभाग आरक्षणावर थेट परिणाम होणार असून, सामाजिक न्यायाच्या तत्त्वांना बाधा येण्याची शक्यता आहे.
या विरोधावेळी वंचित आघाडीचे कार्यकर्ते संजय किर्तक, उमेश देवतळे, सतीश चोपडे, संतोष कीर्तक, सुरेंद्र सोळंके, निलेश लोणाग्रे, संदीप शिरसाट आदी उपस्थित होते. त्यांनी प्रशासनाकडे प्रभाग रचनेत आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी केली.
वंचित बहुजन आघाडीने इशारा दिला आहे की, जर तात्काळ दुरुस्ती करण्यात आली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. आता प्रशासन या हरकतीवर काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.