पुणे : १ जानेवारी रोजी होणाऱ्या भीमा-कोरेगाव शौर्य दिनाच्या पूर्वसंध्येला, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य ‘शौर्य दिन अभिवादन बाईक रॅली’ चे आयोजन करण्यात आले आहे.
३१ डिसेंबर रोजी रात्री ही रॅली निघणार असून, विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. ही भव्य रॅली ३१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजता पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू होईल. ही रॅली पुणे स्टेशन ते भीमा-कोरेगाव विजयस्तंभ या मार्गाने मार्गस्थ होणार असून, मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हा अभिवादन सोहळा सुरू राहणार आहे.
युवा नेतृत्वाखाली शौर्याचा जागर
शौर्य दिनाचे औचित्य साधून दरवर्षी लाखो अनुयायी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतात. यावर्षी सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली युवकांचे संघटन करून एका शिस्तबद्ध रॅलीद्वारे हे अभिवादन केले जाणार आहे. या रॅलीच्या माध्यमातून ऐतिहासिक शौर्याचा वारसा आणि आंबेडकरी चळवळीची ऊर्जा तरुणांमध्ये रुजवली जात आहे.
प्रचंड संख्येने सहभागी होण्याचे आवाहन –
आयोजकांतर्फे पुण्यासह परिसरातील सर्व भीमसैनिकांना आणि तरुणांना या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “चला, विजयस्तंभाला मानवंदना देऊया आणि शौर्य दिन उत्साहात साजरा करूया,” अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.





