वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’ला सुरुवात झाली आहे. या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते तथा राज्य कार्यकारिणी सदस्य सुजात आंबेडकर करत आहेत. मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेतले असून, जोरदार घोषणाबाजी करत आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक, आर्वी नाका येथून या मोर्चाला सुरुवात झाली असून मोर्चा महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी गेट, त्रिमूर्ती नगर, वर्धा येथे धडकणार आहे.





