मालेगाव: वडनेर खाकुर्डी (ता. मालेगाव) येथे मातंग समाजातील एका कुटुंबावर जातीय द्वेषातून अमानुष अत्याचार करण्यात आले होते. या घटनेत केलेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज (दि. २३)
एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी ११ वाजता होणार आहे.
नेमकी घटना काय?
वडनेर खाकुर्डी येथे एका मातंग समाजाच्या अल्पवयीन मुलाचे मुंडन करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर पीडित कुटुंबाचे घरही जाळण्यात आले होते. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अॅट्रोसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी घटनेला दिवस उलटूनही मुख्य आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. प्रशासनाच्या या भूमिकेचा वंचित बहुजन आघाडीने तीव्र निषेध केला आहे.
पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि पोलिसांच्या सुस्त कारभाराचा निषेध करण्यासाठी हे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अरुण जाधव, महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया प्रमुख जितरत्न पटाईत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
“जातीय द्वेषातून झालेला हा हल्ला माणुसकीला काळीमा फासणारा आहे. जोपर्यंत आरोपींना बेड्या ठोकल्या जात नाहीत, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील,” अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली आहे. नाशिक पूर्व – मालेगाव भागातील सर्व न्यायप्रिय नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.





