एकनाथनगर : औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने एकनाथनगरमध्ये जोरदार प्रचार करत आपले अस्तित्व अधोरेखित केले आहे. प्रभाग क्रमांक २८, एकनाथनगर येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक जोशपूर्ण प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती.
रॅलीदरम्यान नागरिकांना संबोधित करताना सुजात आंबेडकर यांनी विकासाच्या मुद्द्यावर भर दिला. “औरंगाबादच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आता परिवर्तन गरजेचे आहे. केवळ आश्वासने नको तर प्रत्यक्ष कृती हवी. शहराच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी वंचित बहुजन आघाडीच्या हक्काच्या उमेदवारांना निवडून द्या,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
औरंगाबादमध्ये परिवर्तनाचे वारे; चिकलठाण्यात सुजात आंबेडकरांच्या रॅलीला तरुणांची मोठी गर्दी

नागरी प्रश्नांवर थेट संवाद
प्रचार रॅलीच्या माध्यमातून सुजात आंबेडकर यांनी एकनाथनगरमधील नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी शहरातील पायाभूत सुविधा, दर्जेदार शिक्षण, रोजगार आणि प्रलंबित नागरी प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडीची नेमकी भूमिका काय असेल, हे स्पष्टपणे मांडले. त्यांच्या या संवादाला स्थानिक रहिवाशांनी उत्स्फूर्त दाद दिली.

या रॅलीत तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. औरंगाबादमध्ये यंदा बदल घडवून आणण्यासाठी आणि ‘एक संधी वंचितला’ देण्यासाठी नागरिकांमध्ये मोठा सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळाला. या प्रचार दौऱ्यामुळे प्रभाग २८ मध्ये वंचित बहुजन आघाडीची स्थिती अधिक भक्कम झाल्याचे मानले जात आहे.






