मुंबई : बोरीवली येथील ठाकरे ऑडिटोरियममध्ये आज ‘सन्यस्त खडग’ या नाटकाच्या प्रयोगावरून तीव्र पडसाद उमटले. या नाटकात तथागत गौतम बुद्ध यांची विटंबना करण्यात आल्याचा आरोप करत काही बौद्ध संघटनांनी जोरदार निदर्शने केली. वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपला निषेध व्यक्त केला आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
‘सन्यस्त खडग’ या नाटकामध्ये तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचे आणि प्रतिमेचे चुकीच्या पद्धतीने चित्रण केले जात असल्याचा आरोप आहे. या प्रयोगाला एक दिवस अगोदरच बोरीवली पोलीस स्टेशनला पत्र देऊन नाटक रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने संतप्त आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
चेतन अहिरे यांनी म्हटले आहे की, आम्ही नाटकाची तिकिटे खरेदी केली असतानाही आम्हाला सभागृहात प्रवेश नाकारला जात आहे. आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. त्यांनी सर्व बौद्ध बांधवांना या प्रयोगाची माहिती दिली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्धांचा विजय असो, हे नाटक रद्द झालेच पाहिजे अशा घोषणा दिल्या.
आंदोलकांनी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. आंदोलकांनी पोलिसांना पत्र दिले होते की, या नाटकात गौतम बुद्धांची विटंबना केलेली आहे. त्यांना चुकीच्या शब्दांमध्ये त्यांचे हे केलेले आहे. आपण बौद्ध समाजाला कृपया मी विनंती करतो की, मुंबईतील, महाराष्ट्रातील बौद्ध समाजाला आपण आमच्या पत्राच्या अनुषंगाने काय कारवाई केली हे समजले पाहिजे, असे अहिरे यांनी म्हटले.
यावेळी आंदोलकांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही याची काळजी घेण्याचे आश्वासन दिले, मात्र पोलिसांनी त्यांच्या निवेदनावर काय कारवाई केली, हे महाराष्ट्राला कळायला पाहिजे अशी मागणी केली. ज्या देशाचे पंतप्रधान परदेशात जाऊन सांगतात की ‘बुद्ध की भूमी से आया’, त्या देशामध्ये बुद्धांचा अवमान होत असेल तर इथल्या प्रशासनाने ते का सहन करावे आणि आम्ही का सहन करावे? आमच्याबरोबर तुमची तेवढी जबाबदारी आहे, असे अहिरे यांनी नमूद केले.
पोलिसांच्या बंदोबस्तात नाटक सुरू असल्याने आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. ज्याच्यामध्ये अवमान होतोय तिकडे पोलीस प्रशासन त्यांचे नाटक होऊ द्या असे म्हणतेय, तर महाराष्ट्राच्या बौद्ध धर्माच्या सर्व बौद्ध बांधवांना कळायला पाहिजे की कुठल्या प्रकारचा तुमच्यावर दबाव आहे का? किंवा कुठल्या प्रकारे आम्ही जे निवेदन दिले तुम्ही डब्यात टाकून दिले का? काहीतरी आम्हाला कळायला पाहिजे, अशी विचारणा त्यांनी केली.
आंदोलकांनी नाटक आयोजक, पब्लिश करणारे आणि कलाकार यांचा जाहीर निषेध केला. खूप चुकीच्या पद्धतीने इथले सरकार, इथले कलाकार मंडळी वागत आहेत. आज तमाम बौद्ध बांधवांच्या भावना दुखावलेल्या असताना सुद्धा पोलीस प्रशासन आम्हाला कुठल्याच प्रकारचे सहकार्य करत नाहीये, असे अहिरे यांनी म्हटले.
‘सन्यस्त खडग’ हे सावरकर लिखित नाटक बोरीवलीमध्ये दाखवले जात असून, महाबोधी महाविहार बिहार इथे सुद्धा ब्राह्मणांनी कब्जा केल्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला.
आंदोलकांनी नाटकाचे तिकीट खरेदी केले असूनही त्यांना प्रवेश न दिल्याने ते अधिकच संतप्त झाले आहेत. आम्ही पैसे दिलेत, आम्ही हे तिकिटाचा शो बघण्यासाठी आम्हाला का सोडले जात नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला.
या घटनेचा निषेध करत आंदोलकांनी भविष्यात मुंबईमध्ये अशा प्रकारचे नाटक चालू देणार नाही, असा इशारा दिला. पुढच्या वेळी पूर्ण ताकदीने येऊ, असेही त्यांनी म्हटले.