अकोला : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर २० डिसेंबरपर्यंत ईव्हीएम मशीन तसेच त्यातील बॅटरी ठेवून दिल्याबाबत वंचित बहुजन आघाडीने गंभीर आक्षेप नोंदवला आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण होऊनही ईव्हीएम दीर्घकाळ ठेवण्यात आल्याने निवडणुकीची पारदर्शकता आणि सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण होत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे मत आहे.
यासंदर्भात यशवंत भवन, अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अरुंधती शिरसाठ, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर आणि युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी संभाव्य गोंधळ आणि गैरव्यवहाराबाबत चिंता व्यक्त केली.
ईव्हीएम मशीन आणि बॅटरी ठेवण्याच्या कालावधीतील अस्पष्टता व अकार्यक्षमता ही निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नउपस्थित करणारी असल्याचे त्यांनी म्हटले.पत्रकार परिषदेला वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आम्रपाली खंडारे, प्रदीप वानखेडे तसेच युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे हे उपस्थित होते.
निवडणूक आयोगाने या प्रकरणाचा खुलासा करून पारदर्शकता सुनिश्चित करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.






