नागपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये नागपूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सर्कल्समध्ये वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असून, विजयाचा निर्धार पक्षाने केला आहे. या पार्श्वभूमीवर, पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हा प्रभारी कुशल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली सावनेर येथे तालुकानिहाय संवाद दौरा व आढावा बैठक उत्साहात पार पडली.

या बैठकीला जिल्हाध्यक्ष अजय सहारे आणि महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष महानंदा राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
संघटनात्मक बांधणीवर भरसावनेर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांशी संवाद साधताना कुशल मेश्राम यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले. या संवाद दौऱ्यात सर्कलनिहाय संघटनात्मक बांधणी, नवीन शाखांची स्थापना, सर्कल आरक्षण आणि निवडणुकीच्या व्यूहरचनेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक सर्कलमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच मैदानात उतरले पाहिजे, असे प्रतिपादन मेश्राम यांनी केले.

काँग्रेसला धक्का: सुषमाताई तभाने यांचा वंचितमध्ये प्रवेश
गेल्या २० वर्षांपासून प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या सुषमाताई तभाने यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी पक्षप्रवेश केल्याने सावनेर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढली आहे.
पदाधिकाऱ्यांची उपस्थितीया बैठकीला जिल्हा कार्यालयीन सचिव वैभव येवले, उपाध्यक्ष धनेश्वर ढोके, आयटी सेल प्रमुख शुभम वाहने, जिल्हा महासचिव माधुरी खोब्रागडे, जिल्हा उपाध्यक्ष रमा मेश्राम, तालुकाध्यक्ष सचिन मडके, शहराध्यक्ष सुशील ब्रह्मरक्षे यांच्यासह राजू बागडे, सुरज गणेर, मनोज बागडे, परमानंद मानवटकर, रेखा बोरकर, वनिता सोमकुवर आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन तालुकाध्यक्ष सचिन मडके यांनी केले, तर आभार सुरज गणेर यांनी मानले. या दौऱ्यामुळे नागपूर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.






