पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन !
पुणे : न्यायाची ऐशी की तैशी असे म्हणत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी पुणे पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर थेट प्रहार केला. कोथरुड पोलिसांनी तीन सामाजिक कार्यकर्त्यांवर केलेल्या छळाच्या विरोधात अत्याचारित तीन महिला, अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते १ ऑगस्टपासून सकाळी १०.३० वाजल्यापासून पोलिस आयुक्त (CP) कार्यालयासमोर ठाण मांडून बसले आहेत.
त्यांनी एक्स वर पोस्ट करत आपली भूमिका मांडली आहे. रात्री ११.१५ वाजता पोलिसांकडून अजून एका तासाने FIR घेतो, नाहीतर FIR घेणार नाही असे लिहून देतो असे सांगण्यात आले.
मात्र, प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे महिलांनी आणि कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. प्रशासनाच्या या वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलकांनी CP कार्यालयातच मुक्काम ठोकला आहे. या संघर्षातून न्याय मिळवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला असून, पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका होऊ लागली आहे.