अहमदनगर : जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता वंचित बहुजन आघाडीने आपला मोर्चा अहमदनगर महानगरपालिकेकडे वळवला आहे. नवनिर्वाचित नगरसेवकांच्या जाहीर सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून पक्षाने महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून, स्वबळावर किंवा समविचारी पक्षांच्या सोबतीने सत्तेचा झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
जिल्ह्यातील विविध नगरपरिषदांमध्ये प्रस्थापितांना धक्का देत निवडून आलेल्या पाच नगरसेवकांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला. यामध्ये जामखेड नगरपरिषदेचे ॲड. अरुण जाधव व संगीता भालेराव, देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे संतोष चोळके आणि संगमनेर नगरपरिषदेचे अमजदखान पठाण व विजया गुंजाळ या विजेत्या शिलेदारांचा समावेश होता.
या सत्कार सोहळ्यात बोलताना राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांनी कार्यकर्त्यांना अधिक जिद्दीने कामाला लागण्याचे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीत सर्वसामान्य आणि उपेक्षित घटकांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून पक्ष मैदानात उतरेल, असे स्पष्ट केले. याच कार्यक्रमात प्रभाग क्रमांक ९-क मधून शोभा आल्हाट यांची उमेदवारीदेखील जाहीर करण्यात आली, ज्यामुळे निवडणुकीच्या तयारीला अधिक वेग आला आहे. हा सोहळा भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण जिल्हा, शहर आणि युवा आघाडीसह भारतीय बौद्ध महासभा, पारनेर तालुका कार्यकारिणी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन या संघटनांनीही नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमास सुहास धीवर, मनोज साळवे, भंते सुमित बोधी, जिल्हा सल्लागार जे.डी. शिरसाठ, शहराध्यक्ष हनीफ शेख, युवा जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलुमे यांसह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक पाटोळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पोपट जाधव यांनी मानले.
या सोहळ्यामुळे अहमदनगरमधील राजकीय वातावरण तापू लागले असून, वंचित बहुजन आघाडीने आपल्या संघटनात्मक शक्तीचे प्रदर्शन घडवत प्रस्थापित पक्षांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.






