औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबिकानगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. प्रभाग क्रमांक २४ मधील अधिकृत उमेदवार सतीश आसाराम गायकवाड, अनुजा अमर जगताप, सुनीता रामराव चव्हाण आणि रवी भिकाजी चव्हाण यांच्या प्रचारार्थ ही सभा पार पडली.

यावेळी बोलताना प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी प्रभाग क्रमांक २४ मधील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधले. “उत्तम आरोग्य सुविधा, वेळेवर व स्वच्छ पाणीपुरवठा, दर्जेदार रस्ते, स्वच्छता, शिक्षण व इतर नागरी सुविधा या सर्व गोष्टी नागरिकांचा हक्क आहेत. मात्र आजही अनेक प्रभाग विकासापासून वंचित आहेत. हा अन्याय दूर करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सक्षम व प्रामाणिक उमेदवार निवडून देणे गरजेचे आहे,” असे त्या म्हणाल्या.

प्रभाग क्रमांक २४ च्या सर्वांगीण विकासासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध असून सामान्य नागरिक, महिला, युवक, कामगार, वंचित घटक यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम केले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढली तरच खऱ्या अर्थाने लोकहिताचे निर्णय घेतले जातील,” असे स्पष्ट आवाहन त्यांनी मतदारांना केले.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अरुंधती शिरसाठ तसेच वंचित उमेदवारांचा परिचय करून देत, “सर्व उमेदवार प्रभागातील समस्या जाणणारे, जनतेशी थेट जोडलेले आणि संघर्षातून पुढे आलेले आहेत. त्यामुळे त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा,” असे आवाहन केले.

सभेला स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक व नागरिकांची मोठी उपस्थिती होती. घोषणाबाजी आणि उत्साहपूर्ण वातावरणात सभा पार पडली. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजयी करून प्रभाग क्रमांक २४ च्या विकासासाठी संधी देण्याचा निर्धार नागरिकांनी यावेळी व्यक्त केला.






