औरंगाबाद : आगामी औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने प्रचाराला वेग दिला असून प्रभाग क्रमांक ८ आंबेडकर नगर येथे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या समर्थनार्थ भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी उपस्थित राहून नागरिकांशी थेट संवाद साधला.

प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडलेल्या या रॅलीदरम्यान सुजात आंबेडकर यांनी औरंगाबाद शहराच्या सर्वांगीण विकासासाठी वंचित बहुजन आघाडीला एक संधी देण्याचे आवाहन केले. “शहराचा आणि नगरांचा खरा विकास साधायचा असेल, तर हक्काचे आणि सामान्य जनतेचे प्रश्न मांडणारे उमेदवार निवडून देणे आवश्यक आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे विकासासाठी कटिबद्ध असून, त्यांना विजयी करा,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

या रॅलीत तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह विविध समाजघटकांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. ‘एक संधी विकासासाठी’, ‘वंचितला संधी द्या’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. औरंगाबादमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह आणि अपेक्षा दिसून आल्या.

या प्रचार रॅलीला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, निवडणुकीत शहरात राजकीय बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






