मुंबई : गोवंडी परिसरात नागरिकांच्या विविध समस्या आणि एम वॉर्डमधील प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडी, मुंबई प्रदेशच्या वतीने आज ‘जन आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.या मोर्चानंतर वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने प्रशासनाला लेखी निवेदन सादर केले.

निवेदनाद्वारे नागरिकांच्या मागण्या तत्काळ मान्य कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आणि मागण्या मान्य केल्या नाहीत, तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या –
1) भारत नगर दरड दुर्घटनेतील 123 कुटुंबांना कायमस्वरूपी पुनर्वसन द्यावे. 18 जुलै 2021 रोजी भारत नगरमध्ये दरड कोसळून 19 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. नंतर डिझास्टर मॅनेजमेंट आणि इस्टेट विभागाने येथील 123 कुटुंबांना विष्णूनगरमधील व्हिडिओकॉन आणि एजीस केमिकल्स येथील इमारतीत तात्पुरते पुनर्वसन दिले होते. परंतु, आजतागायत कायमस्वरूपी पुनर्वसन न देता त्यांच्या वीज–पाणी सुविधा देखील खंडित केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या कुटुंबांना तात्काळ कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून देण्याची मागणी मोर्चातून होणार आहे.
2) सह्याद्री नगर–भारत नगर डोंगरवस्तीतील पाणीटंचाई दूर करून नवीन पाण्याची टाकी बांधावी. डोंगरावर असलेल्या वस्तीमध्ये पाणी अतिशय कमी दाबाने येत असल्याने नागरिकांना पाणी मिळत नाही. तातडीने अतिरिक्त दाबाने पाणी सोडावे आणि त्या भागात महापालिकेची नवीन पाण्याची टाकी बांधण्यासाठी सर्वेक्षण व नियोजनासाठी सल्लागार नेमावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
3) शताब्दी हॉस्पिटलचे खासगीकरण रद्द करून ते महापालिकेकडूनच चालवावे. एम पूर्व विभागात एकही मोठे महापालिकेचे रुग्णालय नसल्याने गरीब नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शताब्दी हॉस्पिटलचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव तात्काळ रद्द करून ते महापालिकेकडूनच सार्वजनिक रुग्णालय म्हणून चालवावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
4) पांजरापोळ टनेल व डोंगर उतारावरील 1400 झोपड्यांना स्थानिक पुनर्वसन. पांजरापोळ परिसरातील 1400 झोपड्यांचे स्थलांतर न करता, तिथेच शेजारी असलेल्या महानगरपालिकेच्या भूखंडावर इमारत बांधून पुनर्वसन घरे देण्यात यावीत.
5) वाशी नाका (आरसी मार्ग) येथील गुंड प्रवृत्तीचे अतिक्रमण हटवून रेलिंग बसवावे. आरसी मार्गावरील फुटपाथ गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अतिक्रमित केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. हे अतिक्रमण तातडीने हटवून फुटपाथवर रेलिंग बसवण्याचे मागणीपत्रातून स्पष्ट करण्यात आले आहे.
6) जय भवानी मार्ग–अयोध्या नगर परिसरातील दुकानदारांचे अतिक्रमण हटवावे. रस्त्यावर दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. संबंधित दुकानांचे अतिक्रमण काढून स्थायी रेलिंग बसवावे, अशी मागणी आहे.
7) पांजरापोळ, भारत नगर, सह्याद्री नगर, इंदिरा नगर येथील शौचालयांची दुरुस्ती व पाहणी. या सर्व भागातील शौचालये दयनीय स्थितीत असून साफसफाई, दुरुस्ती व सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच या शौचालयांची तात्काळ प्रत्यक्ष पाहणी आमच्या उपस्थितीत करावी, अशीही मागणी आहे.
8) बांधकामांमुळे वाढलेले वायु प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने कारवाई करावी. लोकवस्तीच्या बाजूला सुरू असलेल्या मोठ्या बांधकामांमुळे धूळ, धूर आणि प्रदूषण वाढले आहे.
9) वॉर्डस्तरावर नियुक्त पथकाने त्वरित कार्यवाही करावी तसेच नागरिकांच्या प्रतिनिधींनी सोबत प्रकल्पस्थळी जाऊन प्रत्यक्ष तपासणी करून आदेश द्यावेत, अशी मागणी आहे.
10) विभागातील मोठे व छोटे नाले स्वच्छ करून गाळ तात्काळ उठवावा. नाले वेळेवर न साफ केल्याने घाणीचा त्रास, डेंग्यू–मलेरिया सारख्या आजारांचा धोका वाढत आहे. नाल्यातील गाळ तातडीने काढून नाले पूर्णपणे स्वच्छ ठेवावेत.
या जन आक्रोश मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे, महिला आघाडी मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी, युवा आघाडी मुंबई प्रदेशाध्यक्ष सागर गवई, मुंबई महासचिव सतीश राजगुरू, पदाधिकारी स्वप्नील सरदार तसेच मोठ्या इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





