मुंबई : “महाराष्ट्र काँग्रेसचे नेते वेगवेगळी विधानं करून, वेगवेगळी कारणं देऊन वंचित बहुजन आघाडीला सोबत घेणं का टाळत आहेत? याचे उत्तर त्यांनी जनतेला दिलं पाहिजे.” असा सवाल उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून प्रस्ताव आला नसल्याचे विधान नुकतेच नाना पटोले यांनी केले होते. त्यावर बोलताना वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना 1 सप्टेंबर 2023 रोजी पत्र पाठविल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना युती आघाडीचा कुठलाही अधिकार नसल्यामुळे आम्ही केंद्रीय नेतृत्वाला पत्र पाठविले आहे राज्यातील नेत्यांना पत्र देण्याची आवश्यकता नाही असे विधान मोकळे यांनी केले आहे.
पुढे बोलताना सिद्धार्थ मोकळे असे म्हणाले की, “नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मात्र ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची री ओढताना दिसत आहेत. शरद पवारांचा वंचित बहुजन आघाडीला असलेला विरोध आम्हाला माहित आहे. आणि त्यांचीच री ओढण्याचा काम नाना पटोले करत आहेत. त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राहुल गांधीच्या भूमिकेची री ओढावी असे आवाहन आम्ही त्यांना करतो.”
फुले – आंबेडकरी जनतेची केवळ मतं घ्यायची पण त्यांना सत्तेचा वाटा द्यायचा नाही अशी काँग्रेसची भूमिका आहे का? वंचित आणि बहुजनांचे नेतृत्व करणाऱ्या वंचित बहुजन आघाडी सारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या पक्षाला बाजूला ठेऊन भाजपला कसे हरवणार आहात? तुम्हाला खरंच भाजपला हरवायचे आहे का? असे टोकदार प्रश्न सिद्धार्थ मोकळे यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांना विचारले आहेत. काँग्रेसचे नेते वेगवेगळे विधान करून वेगवेगळी कारण देऊन वंचित बहुजन आघाडी सोबत युती करणे टाळत आहेत असा आरोप यावेळी त्यांनी केला.