अमरावती : वंचित बहुजन आघाडी व युनायटेड रिपब्लिकन फोरमच्या संयुक्त मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन व जाहीर सभा प्रभाग क्रमांक १०, फ्रेजरपुरा–रुख्मिणी नगर, अमरावती येथे मोठ्या उत्साहात पार पडली. सभा ही घोषणांनी दणाणून गेला.
मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजता झालेल्या या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सुजात आंबेडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या प्रसंगी बोलताना सुजात आंबेडकर यांनी वंचित, शोषित समाजासह मुस्लिम समाजाच्या हक्कांसाठी ठामपणे उभे राहणारे एकमेव नेते बाळासाहेब आंबेडकर असल्याचे सांगितले. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी सुप्रीम कोर्टापर्यंत लढा देत न्याय मिळवून देण्याचे काम बाळासाहेब आंबेडकर यांनी केल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच कोथरूड प्रकरणात पोलिसांनी पीडितांची तक्रार नोंदवून न घेतल्यावर बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष अरविंद तायडे आणि नेत्या रेखा चौरे यांनी न्यायालयात दाद मागून पोलिसांवर गुन्हे दाखल करून घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
स्थानिक विकासासोबतच वंचित आणि शोषित घटकांसाठी सातत्याने संघर्ष करणारा एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी असल्याचे सांगत, महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या संख्येने विजयी करण्याचे आवाहन सुजात आंबेडकर यांनी केले.

अमरावती महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत सुरू असताना फ्रेजरपुरा–रुख्मिणी नगर, अमरावती येथे झालेल्या जाहीर सभेत मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. सभेला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






