बडनेरा : अमरावती महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची मंगळवार, ६ जानेवारी रोजी बडनेरा येथे जाहीर सभा संपन्न झाली. या सभेला नागरिकांनी अलोट गर्दी केली होती, ज्यामुळे बडनेऱ्यात ‘वंचित’ने मोठे शक्तिप्रदर्शन केल्याचे दिसून आले.

सभेची दिमाखदार सुरुवात
बडनेरा येथील नवी वस्ती, आठवडी बाजार भागात ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. सभेची सुरुवात सुजात आंबेडकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित जनसमुदायाने दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

प्रत्येक घराला नळ आणि स्वच्छ पाणी हेच आमचे ध्येय
उपस्थितांना मार्गदर्शन करताना सुजात आंबेडकर यांनी स्थानिक प्रश्नांवर बोट ठेवले. ते म्हणाले की, “अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी आता बदलाची गरज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांसाठी नागरिक संघर्ष करत आहेत. जर तुम्हाला प्रत्येक घराला नळ आणि त्या नळाला स्वच्छ पाणी हवे असेल, तर तुम्हाला सत्ता परिवर्तन करावे लागेल.”

स्थानिक विकासावर भर
सुजात आंबेडकर यांनी आपल्या भाषणात स्थानिक विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य दिले. त्यांनी पुढे आवाहन केले की, “वंचित आणि उपेक्षितांच्या हक्कासाठी, तसेच शहराच्या आधुनिक आणि पारदर्शक विकासासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करा.”

बडनेरा येथील झालेल्या या जाहीर सभेला महिला, तरुण आणि ज्येष्ठांची मोठी उपस्थिती होती. जनसमुदायांनी सभेला प्रचंड प्रतिसाद दिला. तसेच घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. सुजात आंबेडकरांना ऐकण्यासाठी झालेली ही गर्दी महानगरपालिका निवडणुकीत प्रस्थापित पक्षांसमोर मोठे आव्हान उभे करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.






