उन्नाव : उत्तरप्रदेशात उन्नाव (Unnao) पुन्हा चर्चेत आलं आहे. येथील एका दलित तरुणीच्या अपहरण व हत्येचं प्रकरण समोर आलं आहे.
उन्नाव (Unnao) येथील २२ वर्षांची एक दलित तरुणी २ महिन्यांपासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह ज्या जागेवर सापडला ती जागा समाजवादी पक्षाचे माजी नेते फतेह बहादूर सिंघ याच्या आश्रमा जवळ आहे.
फतेह बहादूर सिंघ हे समाजवादी पक्षाचे सरकार असताना मंत्री देखील होते. त्यांचा मुलगा राजोल सिंघ हा या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे.
मृत तरुणीच्या आईने आधीच राजोल सिंघ वर संशय व्यक्त केला होता, परंतु त्यावेळी स्थानिक पोलिसांनी कार्यवाही केली नाही. यामुळे एकाला बडतर्फ केल्याची माहिती उन्नाव पोलिसांनी दिली.
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मधातच हे प्रकरण समोर आल्याने यावर राजकारणही तापल्याचे दिसत आहे.
काँग्रेसच्या प्रियांका गांधी यांनी तरुणीच्या आईशी फोनवर चर्चा केली. तसेच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उर्फ अजय बिष्ट यांना लक्ष करत कारवाईची मागणी केली.
बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी समाजवादी पार्टीला लक्ष केले. समाजवादी पार्टीच्या नेत्याच्या जमिनीत मृतदेह मिळाला असे म्हणत, हि घटना दुःखद असून राज्य सरकारने त्वरीत कारवाई करावी अशी मागणीही केली.
समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांनी त्या व्यक्तीचा पक्षाशी संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले. जी व्यक्ती पक्षात होती (आरोपीचे वडील) ती ४ वर्षांपूर्वीच मरण पावल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आरोपी राजोल सिंघ हा पक्षाचा सदस्य नसून त्याचा पक्षाशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले. पोलीस व प्रशासनाने आरोपीवर कारवाई करावी अशी मागणीही केली.