राजस्थान : जैसलमेर येथे मंगळवारी सायंकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. एका खासगी एसी स्लीपर बसला अचानक लागलेल्या भीषण आगीत २० प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १६ जण गंभीररित्या भाजले आहेत.
भयानक अग्निकांड आणि थरार
एसी स्लीपर बस वाऱ्याच्या वेगाने धावत असताना अचानक तिला आग लागली. आगीचा भडका इतका मोठा होता की, काही क्षणातच तिने संपूर्ण बसला कवेत घेतले. विशेष म्हणजे, आग लागूनही बस काही काळ धावतच राहिली. या ‘बर्निंग बस’चा भयानक थरार अनेकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला. बसमध्ये प्रवास करत असलेले प्रवासी जीव वाचवण्यासाठी किंकाळ्या आणि आरडाओरडा करत होते. या भीषण परिस्थितीत बसमध्ये भयावह वातावरण निर्माण झाले होते.
या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, बचाव पथक आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यात यश आले, मात्र तोपर्यंत २० निष्पाप प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
१६ प्रवासी गंभीर जखमी, मृतांची संख्या वाढण्याची भीती
या दुर्घटनेत १६ प्रवासी गंभीररित्या भाजले आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी बहुतेक प्रवासी ५० ते ७० टक्क्यांहून अधिक भाजले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
प्राथमिक उपचारानंतर या सर्व गंभीर जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी जोधपूर येथे हलवण्यात आले आहे. जखमींमध्ये महिपाल सिंग, ओमाराम, युनूस, मनोज भाटिया, इक्बाल, फिरोज, भागा बाई, पीर मोहम्मद, जीवराज, हुसेन, इमामत, विशाखा, आशिष, रफिक, लक्ष्मण आणि उबेदुल्ला यांचा समावेश आहे.
शॉर्ट सर्किटमुळे आगीचा प्राथमिक अंदाज
बसला आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र प्राथमिक तपासानुसार, एसीमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे हा भडका उडाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही प्रवाशांनी खिडकीतून उडी मारून आपला जीव वाचवला, परंतु आगीची तीव्रता इतकी होती की, संपूर्ण बस जळून खाक झाली. या भीषण आणि दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे.