भारतीय इतिहास हा अनेक हेतूंनी, छल कपटांनी आणि वर्चस्वाच्या दंभातून लिहिलेला आहे. येथील शिक्षणाची सर्वंकष मक्तेदारी ही ब्राह्मणशाहीच्या मालकीत पूर्वापार राहिलेली असल्याने त्या मालकीचा प्रभाव येथील इतिहास लेखनावर असल्याचे दिसून येते. वर्णाधिष्ठित धर्माच्या वर्चस्वाचा इतिहास त्यातूनच निर्माण करण्यात आलेला आहे. सनातनी सोवळ्यातील सांस्कृतिक दहशत समाजजीवनाच्या सर्वच क्षेत्रावर टिकून राहवी, हा दृष्ट हेतू त्यामागे राहिलेला आहे. त्या वृत्तीतून प्राचीन आणि अर्वाचीन इतिहासात अनेक अक्षम्य भानगडी घुसविल्याचे सबळ दाखले उपलब्ध आहेत. कल्पित मिथकं, प्रतीकं आणि घटनांना वास्तविकतेचा मुलामा देऊन, येथील बहुतांश इतिहास रचल्याचे त्या दाखल्यांच्या आधारे मर्मज्ञ इतिहासकारांनी सप्रमाण सिद्ध केलेलं आहे. महान क्रांतिकारक जोतीराव फुलेंनी, त्या एकूणच षडयंत्रास ‘ब्राह्मणाचे कसब’ असे संबोधले होते, हे सर्वश्रुत आहे. ब्राह्मणशाही आणि बौद्धधम्म संस्कृती या दोन परस्परविरोधी विचारधारांचा ऐतिहासिक संघर्ष बुद्धकाळापासून कायम राहिलेला आहे. सामाजिक समता, नीती आणि विज्ञानवाद या मूल्यांच्या विरुद्ध वर्णाधिष्ठित विषमता, नैतिकता आणि मनूवाद असे मूल्यात्मक स्वरुप त्या संघर्षाचे राहिलेले आहे. बुद्धाच्या अहिंसावादी समाजक्रांतीच्या पर्वात ब्राह्मणी वर्णजातस्त्रीदास्यत्व, रुढी-परंपरा व पुरोहितांच्या अमानवी कर्मकांडांना बुद्धाने प्रखरतेने विरोध केला. सामाजिक क्रांती घडविली. वैदिक धर्माच्या विषमतावादी तत्त्वज्ञानाचा दंभस्फोट त्यांनी विज्ञानाच्या कसोटीवर परजून केला. परिणामी त्या कृतिप्रवण जागरणातून समतेवर आधारित बौद्ध संस्कृतीची रुजवण तत्कालीन अवघ्या जंबुद्विपात झाली, असे इतिहास सांगतो. बौद्ध संस्कृतीच्या पायरवामुळे वर्णाधारीत वैदीक संस्कृतीचे अस्तित्व त्यामुळे धोक्यात आले. पुढील काळात ब्राह्मणशाहीच्या प्रकोपातून आणि त्यांच्या अनेकविध षडयंत्रांच्या राबवणुकीतून, बौद्धसंस्कृतीचा विलय झाल्याचे प्रत्ययास येते. यासंदर्भाने बाबासाहेबांनी ‘क्रांती आणि प्रतिक्रांती’ ( Revolution And Counter Revolution ) या त्यांच्या ग्रंथांत सविस्तर मांडणी केलेली आहे. तो इतिहास उलगडण्यासाठी बाबासाहेबांचा उदय व्हावा लागला. सम्यक इतिहासाच्या शोधासाठी व नव्याने बौद्ध संस्कृतीच्या रोपनासाठी बाबासाहेबांनी केलेले उत्खनन उपकारकचं ठरलेलं आहे.
भारतीय इतिहास जसा लिहिला व सांगितला जातो, तो ‘जैसे थे’ स्वीकारायचा, असा प्रघातही इथे भूदेवांच्या प्रभावातून अज्ञानी समष्टीत राहिलेला आहे. इतिहासातील मनगढन तथ्यांविरोधात प्रश्न विचारण्याची व सैद्धांतिक साक्षीपुरावे न पडताळण्याची परंपरादेखील त्या सांस्कृतिक दहशतीतूनच बहुजनांमध्ये रुजलेली आहे. परिणामी सोवळ्यातील ब्राह्मणशाहीने बहुतांश इतिहास हा त्यांच्या वर्चस्वाचा, सोईचा, मानवतावादी महापुरुषांना अनुल्लेखाने मारणारा आणि मानवी मूल्यांचे हनन करणारा, असा कावेबाज रचलेला दिसून येतो. त्यामुळे सत्यान्वेषी इतिहास अंधारकोठडीत दडपून राहिला. तो प्रकाशमान होण्यास पुढे शतावधी वर्षे लागली. बौद्ध संस्कृतीच्या पाडावानंतर अनेक शतकांनी, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लुप्त झालेले बुद्धांचे समतावादी तत्त्वज्ञान आणि बौद्धसंस्कृती सूत्ररुपात पुन्हा प्रकाशमान केली. बौद्ध संस्कृतीच्या संदर्भाने जगभरातील जिज्ञासूंनीही मौलिक संशोधन केलेलं आहे. परंतु भारतीय स्तरावर व महाराष्ट्राच्या मराठीत काही अपवाद वगळता त्या संदर्भात फारसं संशोधन झालेलं नाही. त्यामुळे अनेक ऐतिहासिक तथ्ये त्यांच्या अनुल्लेखामुळे अडगळीत पडून राहिलेले आहेत. बुद्धकालीन ‘थेरीगाथा’ हा ग्रंथ त्यापैकीच एक आहे.
आंबेडकरोत्तर कालखंडातील आंबेडकरी विचार जाणिवा असलेल्या अभ्यासकांना अडगळीतील इतिहास खुणावत राहिलेला आहे. नेनीवेतील ते सूचन शिरोधार्य घेऊन जे अभ्यासक मार्गस्थ राहिलेले आहेत, त्यापैकी आयुष्मान देवेंद्र उबाळे हे एक महत्वाचं नांव आहे. बौद्ध वाङ्मयाचे व पालि भाषेचे ते साक्षेपी अभ्यासक असून लेखकीय कौशल्य त्यांनी जोपासलेलं आहे. पालि भाषेतील ‘थेरीगाथा’ हा ग्रंथ जागतिक साहित्याच्या इतिहासात स्त्रियांचे आत्मभान अधोरेखित करणारा, स्त्रियांनी लिहिलेला पहिला ग्रंथ आहे. बुद्धकालीन निवडक भिक्षुणींचे आत्मभान, आंतरिक सामर्थ्य आणि आत्मविश्वास त्यातून प्रकट होतो. या ग्रंथातील विविध पैलूंवर अभ्यासूंनी सखोल चर्चा करून त्या ग्रंथाचे समकालीन मूल्य आणि आजच्या वर्तमानात त्यानुषंगाने विविध बाबींचा तपशीलवार आढावा घ्यावा आणि ती एकूण मांडणी ग्रंथीत व्हावी, या हेतुतून आयु. उबाळे यांनी ‘थेरीगाथा नवे आकलन’ हा ग्रंथ संपादित केला आहे. नाशिकच्या डॉ. आंबेडकर वाङ्मयीन अभ्यासमंडळाने तो प्रकाशित केला आहे.
बौद्ध वाङ्मयात ‘थेरीगाथा’ या मौलिक ग्रंथाचे स्वतंत्र दालन उपलब्ध आहे. शतावधी वर्षे ते अनुल्लेखामुळे पडद्याआड झाकोळलेलं होतं. १९ व २० व्या शतकात परदेशी अभ्यासकांनी त्यांच्या मर्यादित अवकाशात ते प्रकाशमान केले. समकाळात इतर काही मान्यवर अभ्यासकांनीही थेरीगाथांची दखल घेतली. बौद्धसंस्कृतीच्या ऐतिहासिक परंपरेतील बुद्धकालीन स्त्रियांनी लिहिलेला ‘थेरीगाथा’ हा जागतिक स्तरावरील पहिलाच ग्रंथ असल्याचे, त्या संशोधनामुळे शिक्कामोर्तब झाले. बहुपेगडी दास्यत्वाचा त्याग करून, प्रव्रजा स्वीकारलेल्या बुद्धकालीन स्त्रियांनी आपल्या पूर्व आयुष्याचा दु:खव्याकुळ जीवनपट आपल्या काव्यमय शब्दकळांमधून प्रस्तुत गाथांमध्ये नोंदविलेला आहे. त्या ‘गाथा’ वर्तमानातील साहित्य, संस्कृती, जनमानस व स्त्रीवादी चळवळीवर प्रभाव टाकणाऱ्या आहेत. त्यातून बौद्ध मतांचा व थेरीगाथेत समाविष्ट असणाऱ्या थेरींच्या व्यथा-वेदनांचा आणि बुद्धांच्या उपदेशांमुळे त्यांच्यामध्ये झालेल्या परिवर्तनाचा साद्यंत दस्तावेज दडलेला आहे. थेरीगाथांची अशी विविधांगी मौलिकता जाणून, आयु. देवेंद्र उबाळे यांनी प्रस्तुतचा ग्रंथ साकारला आहे. बौद्धदर्शनाच्या अभ्यासकांपैकी निवडक अभ्यासकांचे थेरीगाथांविषयीचे आकलन त्यांनी या ग्रंथात समाविष्ट केलेलं आहे. केवळ संकलन न करता त्यांनी भिक्खू संघातील ‘थेर’ व भिक्षुणी संघातील ‘थेरी’ यांच्या जीवनाबद्दल व त्यानुषंगाने बौद्धधम्म व पालितील बौद्ध वाङ्मयाचा सांराशाने आढावाही त्यांच्या मनोगतात ससंदर्भ नोंदविलेला आहे. आटोपशीर आणि सुलभ मांडणीमुळे त्यांचे संपादकीय मनोगत वाचकांना ग्रंथ वाचण्यासाठी उद्युक्त करणारे ठरले आहे. आयु. उबाळे यांनी आवश्यक त्या लेखांना तळटिपा दिलेल्या आहेत. त्यामुळे संबंधित लेख मुळातून समजण्यासाठी वाचकांना सोईचे ठरले आहे. ग्रंथाला बिपीन बाकळे यांचे मुखपृष्ठ असून ते ग्रंथातील चिंतनशील चर्चेला साजेसे आहे. विरान प्रदेशात डोंगर, कडी-कपारीत जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असलेले ‘सिमोन्तक’ नावाचे झाड, आपल्या नैसर्गिक आत्मबळाच्या जोरावर काताळाचा दंभ फोडून बाहेर येते व बहरते. भिक्षुणी थेरींचा जीवनप्रवासही असाच संघर्षशील राहिलेला आहे. तो आविष्कार आयु.बाकळेंनी साकारलेल्या मुखपृष्ठातून प्रत्ययास येतो.
प्रस्तुत ग्रंथात एकूण आठ मान्यवर अभ्यासकांनी आपापल्या दृष्टीतून साधार चिंतन प्रकट केलेलं आहे. डॉ.ज्ञानेश्वर पवार, डॉ. श्यामल गरुड, प्रा. आशालता कांबळे, सुनील हेतकर, प्रा. सचिन गरुड, अरविंद सुरवाडे, मोतीराम कटारे आणि उर्मिला पवार या साक्षेपी लेखकांचा त्यामध्ये समावेश आहे. ‘थेरीगाथेतील स्त्रियांचे भावविश्व आणि आधुनिक मानसशास्त्र’ हा डॉ. ज्ञानेश्वर पवार यांचा पहिलाच लेख आहे. या लेखात लेखकाने मानसशास्त्रज्ञाच्या विविध संशोधनाच्या आधारे थेरींच्या मनोव्यापाराचे व बुद्धांनी थेरींच्या मानसिक वर्तनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी केलेल्या उपचार पद्धतीचे शास्त्रीय परिभाषेत विश्लेषण केलं आहे. थेरीगाथेतील स्त्रियांचे जीवन हे आजच्या स्त्रियांच्या तुलनेने अतिशय वेदनादायी होते. त्यांच्या दु:खाचे निवारण करण्यासाठी तथागत बुद्धांनी वापरलेल्या उपचार पद्धतींमधून आधुनिक मानसशास्त्रातील, समस्येची पडताळणी, वस्तुनिष्ठता आणि समानता या नियमांचा प्रत्यय येतो, असे मत डॉ. पवार यांनी लेखात नोंदविले आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धांनी व्यक्तींचा आपल्या स्वतःच्या समस्येकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवत, त्यांना सकारात्मक उपदेश करून दु:खमुक्त केलेले होते. बुद्धांच्या दु:खमुक्तीचा हा मानसशास्त्रीय प्रयोग वर्तमानातही दिशादर्शक ठरणारा आहे. असे अनुमान डॉ. पवार यांनी अधोरेखित केलेलं आहे.
‘थेरीगाथेच्या सहोदरी आंबेडकरी स्त्री आत्मकथा’ या विषयावर डॉ. श्यामल गरुड यांनी मांडणी करताना वर्तमान स्त्रीवादी चळवळींचा आढावा घेतला आहे. थेरीगाथा ह्या आंबेडकरी स्त्री आत्मकथनाच्या आद्य पाऊलखुणा आहेत. बुद्धकाळात थेरींनी आपली मनोगते पद्यमय शैलीतून मांडली. जगभरात ही मांडणी महत्त्वपूर्ण मानली गेली. थेरीगाथेतील सर्वच विद्रोही भिक्षुणी, भारतीय स्त्रियांसाठी व स्त्रीवादी चळवळींसाठी आद्य क्रांतिकारी बंडखोर स्त्रिया ठरल्या असत्या. परंतु, येथील तथाकथित इतिहासाने त्यांना अधोरेखित करणे सोयीने टाळले आहे, असा आरोप डॉ. गरुड यांनी नोंदविला आहे. तो रास्तच आहे. थेरी आणि आंबेडकरी स्त्रियांची स्वकथने यांची तुलनात्मक मांडणी करताना; अन्यायाविरुद्धची चीड, आत्मभान आणि सम्यक जीवनधारेचा स्वीकार हे सूत्र घेऊन, त्यांनी थेरी आणि आंबेडकरी स्त्रियांच्या स्वकथनातील भावविश्व यांतील अनुबंध ससंदर्भ मांडलेले आहेत. त्यासाठी त्यांनी थेरीगाथेतील पटाचारा, कुण्डलकेसा, चंदा आदींची उदाहरणे देत, आंबेडकरी स्त्री स्वकथने लिहिणाऱ्या बेबीनंदा कांबळे, डॉ. शांताबाई दाणी, यशोधराबाई गायकवाड, हिरा पवार, उर्मिला पवार आदींच्या स्वकथनातील नायिकांच्या लढाऊ बाण्याचा अनुबंध त्यांनी थेरीगाथेतील नायिकांशी जोडला आहे. त्यांच्या ह्या नुतन आकलनातून बुद्ध ते आंबेडकर यांच्या विचारधारेतील तादात्म्यता स्पष्ट होते.
नंदा मेश्राम यांचे (‘मी, नंदा’ )आणि मल्लिका अमरशेख यांचे (‘ मला उध्वस्त व्हायचंय’ ) ही आत्मकथने अनुक्रमे दलित समाज विरोधी व जात श्रेष्ठतेचा दंभ अधोरेखित करणारी आहेत, असे सटिक भाष्यही डॉ. श्यामल गरुडांनी स्पष्टतेने नोंदले आहे.
प्रा.आशालता कांबळे यांनी ‘थेरीगाथांचा आंबेडकरी स्त्रियांच्या लेखनावरील प्रभाव’ या लेखात तपशीलांसह केलेली मांडणी उद्बोधक आहे. बुद्धकालीन स्त्रियांना सर्वोच्च ज्ञान म्हणजे अर्हंतपद प्राप्त करण्याचा मार्ग महाप्रजापती राणीने मिळवून दिलेला आहे. त्यासाठी तिने बुद्धांपुढे सत्याग्रह केला. ही घटना महत्त्वाची असून, महाप्रजापती गौतमी ही जगातील पहिली सत्याग्रही व स्त्रीमुक्ती चळवळीची आद्यस्त्रोत ठरते. तिच्या भिक्षुणीसंघात सर्व जाती-धर्माच्या, प्रवृतीच्या स्त्रिया सहभागी होत्या. असे नोंदवून त्यांनी कुण्डलकेसा, आम्रपाली, उत्पलवर्णा, मुक्ता, यशोधरा आदी थेरींच्या आयुष्याचा धांडोळा घेतलेला आहे. बाईपणाच्या व जातधर्माच्या गुलामगिरीतून त्या बुद्धांमुळे मुक्त झाल्या. संघातील समतेमुळे त्या ‘डि कास्ट’ व ‘डि क्लास’ झालेल्या होत्या. असे प्रतिपादनही प्रा. कांबळे यांनी केले आहे. थेरीगाथांवर लेखन केलेल्या आंबेडकरी लेखिकांचे नामोल्लेख करून त्यांनी कोणकोणत्या लेखिकेच्या साहित्यावर थेरीगाथांचा प्रभाव पडलेला आहे, त्या संदर्भाने केलेलं सविस्तर विवेचन मूलभूत आहे.
सुनील हेतकर यांनी ‘थेरीगाथा आणि महाराष्ट्रातील संत स्त्रियांची आत्मचरित्रे’ या त्यांच्या लेखात थेरीगाथेतील काव्यमय स्वकथने आणि संत स्त्रियांचे आत्मचरित्रपर अभंग यांचा तुलनात्मक अभ्यास मांडलेला आहे. आकलन, निरीक्षण, साम्यस्थळे व विसंगती या घटकांना केंद्रवर्ती ठेवून त्यांनी थेरीगाथेतील कवणे व संत स्त्रियांचे अभंग यातून प्रसूत झालेल्या विचारांवर मार्मिक भाष्ये नोंदविली आहेत. थेरींच्या कवणांची शैली, त्यांनी प्रतीकांचा केलेला चपखल उपयोग यासंदर्भाने मार्मिक विवेचनही त्यांच्या लेखात वाचावयास मिळते. भारतीय मातीतला पहिला स्त्रीवाद म्हणजे थेरीगाथा होय. असे आत्मविश्वासाने सांगून आयु. हेतकरांनी ‘मार’ ही संकल्पना विशद करताना थेरीगाथेतील काव्यमय शब्दोळी अधोरेखित केलेल्या आहेत. मनाशी म्हणजे ‘माराशी’ संघर्ष करणाऱ्या थेरींच्या कवणातून प्रक्षेपीत होणारे आत्मभान, विकारांविरुद्ध बंड करण्याची त्यांची क्षमता आणि पुढे त्यांचा निब्बाणाकडे सुरू झालेला प्रवास यासंदर्भाने नेमके विश्लेषण करून, हेतकरांनी ‘मार’ ही संकल्पना स्पष्ट केली आहे. त्यासाठी त्यांनी किसा गौतमी, शैला, सोमा, उत्पलवर्णा, चाला, उपचाला, सिसुपचाला आदीं थेरींनी केलेल्या भावात्मक संघर्षाचे प्रकटीकरण असलेल्या कविता उद्धृत केलेल्या आहेत.
संत स्त्रियांच्या आत्मचरित्रांबद्दल सविस्तर माहिती देताना त्यांनी संत मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाई, कान्होपात्रा आदींचे आत्मचरित्रपर अभंग अधोरेखित करून त्यांच्या भावविश्वाचे यथोचित निरुपण केले आहे. त्यातून संत स्त्रियांच्या व्यक्तीगत मुक्तीविषयीचे तत्त्वज्ञान प्रकटते. परंतु, ते तत्त्वज्ञान हिंदू धर्मव्यवस्थेला आणि वर्णव्यवस्थेला धक्का पोहचवत नाही. व्यक्तिगत, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात व्यथा, वेदना, जातीय छळवणूक आदी विविधांगी संकटांना संत स्त्रियां सामो-या जातात. परंतु व्यवस्थेविरुद्ध त्या ‘ब्र’ उच्चारत नाहीत. त्यामुळे त्यांच्या संयत विद्रोहाचे अवकाश मर्यादित ठरते. हेतकरांचा उपरोक्त अभिप्राय त्यांच्या चिंतनाचा निदर्शक आहे.
बुद्धकालीन स्त्रियांचे जीवन पुरुषसत्ताक व्यवस्थेने नियंत्रित केलेले होते. गृहकेंद्री जीवनात त्या पुरुषावलंबी होत्या. परंतु भिक्षुणी झाल्यानंतरच्या गृहविहीन जीवनात त्यांना दु:खमुक्तीचा अनुभव प्रतीत झाल्याचे दाखले थेरीगाथेत मिळतात. भिक्षुणींच्या भौतिक व अध्यात्मिक मुक्तीचा उद्घोष थेरीगाथेत आहे. बुद्धकाळात समताप्रणित पर्यावरणामुळे भौतिक प्रगतीला गती प्राप्त झालेली होती. बुद्धांनी स्त्रीदास्याच्या भौतिक पायावर हल्ला केल्यामुळे, बुद्धकाळात स्त्रियांचे उन्नत घडून आले. स्त्रियांच्या त्या एकूणच बदलत्या जीवनमानाचे/परिवर्तनाचे चित्रण थेरीगाथेत दिसून येते. असे चिंतन आयु. प्रा. सचिन गरुड यांनी ‘भारतीय इतिहासातील पहिल्या स्त्री-मुक्तीचे उदान ‘थेरीगाथा’. या लेखात मांडले आहे. वर्णीय विषमता आणि बौद्ध संस्कृतीतील समता या परस्परविरोधी व्यवस्थांचे विद्वत्तापूर्ण असे सखोल विश्लेषण त्यांनी केले आहे.
‘थेरीगाथा आणि आंबेडकरवादी साहित्यावर त्यांचा प्रभाव’ या विषयावर अरविंद सुरवाडे यांनी मांडणी केली आहे. थेरीगाथांमध्ये प्रकर्षाने विविध वाङ्मयीन मूल्ये आढळतात. आंबेडकरवादी साहित्य लेखनात थेरीगाथेचे प्रतिबिंब उमटणे अपेक्षित आहे. त्यांच्या गाथांमधील प्रतिकांची, रुपकांची, प्रतिमांचे उपयोजन आणि शब्दांच्या अर्थाचा नवीन प्रतीके, प्रतिमा, मिथके यांच्या निर्मितीसाठी यथायोग्य वापर होणे क्रमप्राप्त आहे. आंबेडकरी स्त्रियांच्या स्वकथनाचा प्रेरणास्त्रोत थेरीगाथा असल्यास, आंबेडकरवादी साहित्याला नवा आयाम प्राप्त होऊ शकतो. परंतु, तसे झालेले आढळून येत नाही. असे प्रतिपादन आयु. सुरवाडे यांनी त्यांच्या लेखात केलेले आहे. त्यांचे उपरोक्त मत आंबेडकरवादी अशी आयडेंटिटी सांगणा-या लेखकांना अंतर्मूख करणारे आहे. आंबेडकरवादी साहित्यात धम्मस्वीकारानंतर बुद्धांचे तत्त्वज्ञान, आंबेडकरवाद आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही मूल्ये साहित्यनिर्मितीच्या केंद्रस्थानी येणे अपरिहार्य होते. तसे न होता प्रारंभ काळातील लिहित्या हातांनी दलित आयडेंटिटी स्वीकारून त्या जाणिवेतून दु:खभरा आक्रोश व जातीय अत्याचाराविरूद्ध विद्रोही भूमिकेतून साहित्य निर्मितीला प्राधान्य दिलेले निदर्शनास येते. परिणामी बौद्ध तत्त्वज्ञानातील मिथ्स तयार झाल्या नाहीत त्यामुळे आंबेडकरवादी साहित्यातून अभिजात वाङ्मय निर्माण होऊ शकले नाही. अशी खंत आयु. सुरवाडे यांनी व्यक्त केलेली आहे.
मोतीराम कटारे यांचा ‘थेरीगाथेतील सौंदर्यविचार’ हा चिंतनपर लेख प्रस्तुत ग्रंथात समाविष्ट आहे. ह्या शोधनिबंधातून त्यांनी सौंदर्यशास्त्र व थेरीगाथेतील सौंदर्य अशी दोन भागात चर्चा केलेली आहे. संस्कृत आणि पाश्चात्य साहित्याच्या वेध घेत त्यांनी पारंपरिक सौदर्यशास्त्राच्या निकषांऐवजी बुद्धांचा विचार प्रगत असल्याचे, स्पष्टपणे नोंदवले आहे. मर्ढेकरांच्या लयसिंद्धांतावरही त्यांनी सटिक बोट ठेवून, बौद्धदर्शनातील मानवी मूल्यांच्या बाजूने अनुकूलता दर्शविली आहे. सौंदर्यशास्त्रावर चर्चा करताना त्यांनी बौद्ध तत्त्वज्ञानातील विविध संकल्पनांवर भाष्य नोंदविले असून ते नवे व उद्बोधक आहे. थेरीगाथेतून आलेल्या उपमा, निब्बाण, मानुषता, नीती आणि दु:खनिरोध या संकल्पनाच्या तपशीलवार चर्चेतून त्यांनी थेरीगाथेतील सौंदर्यविचार शब्दबद्ध केलेला आहे. त्यावर साधकबाधक चर्चा होणे आयु. कटारे यांना अपेक्षित आहे.
प्रस्तुत ग्रंथात ‘थेरींची कालातीत थोरवी’ हा शेवटचा लेख आयुष्मती उर्मिला पवार यांचा आहे. त्यांच्या मते, बुद्धकाळातील एकूण ७३ थेरींनी, त्यांच्या पालि भाषेतील ५२२ गांथांमधून समस्त स्त्रियांना प्रज्ञा, आत्मविश्वास, दृढनिश्चय आणि ज्ञानाचे महत्त्व पटवून दिलेले होते. थेरींनी लिहिलेल्या आत्मानुभूतीच्या गाथा वर्तमानातही दु:खमुक्तीचा मार्ग दाखविणाऱ्या आहेत, असे आश्वासक विचार अधोरेखित करून, बौद्धधम्माच्या प्रचार-प्रसारार्थ आणि समस्त स्त्रियांना आपल्यातील सामर्थ्याची जाणीव होण्यासाठी, थेरींच्या जीवनकहाण्या उद्बोधक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यासाठी त्यांनी यशोधरा, पटाचारा, किसागौतमी आणि कुण्डलकेसा या थेरींविषयीच्या कथाकथनाच्या निमित्ताने त्यांना चळवळीच्या पातळीवर आलेले काही अनुभवही मांडलेले आहेत. ‘थेरीगाथा:नवे आकलन’ हा ग्रंथ अभ्यासकांनी आपल्या पदरी आवर्जून ठेवावा, एवढे संदर्भमूल्य प्रस्तुत ग्रंथात निश्चितच आहे.
ग्रंथाचे शीर्षक : थेरीगाथा नवे आकलन
संपादन : देवेंद्र उबाळे
प्रकाशक : डॉ.आंबेडकर वाङ्मयीन अभ्यासमंडळ, नाशिक
किंमत – रू.३००/-
संपर्क : 9422945943