Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home सामाजिक

आंबेडकर आणि आंबेडकरोत्तर भारतीय माध्यमांतील जातवास्तव

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 14, 2021
in सामाजिक
0
आंबेडकर आणि आंबेडकरोत्तर भारतीय माध्यमांतील जातवास्तव
0
SHARES
153
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

काँग्रेसची विचारधारा मान्य असणारी वर्तमानपत्रे बाबासाहेबांच्या भूमिकेला नेहमी विरोध करत राहिली. १८ जानेवारी १९४३ रोजी बाबासाहेबांनी अशा वर्तमानपत्रांचा चांगलाच समाचार घेतला होता. या वर्तमानपत्रांना त्यांनी ‘काँग्रेस प्रेस’ असे संबोधले होते. ‘काँग्रेस प्रेस मला चांगली माहीत आहे. मी त्यांच्या टीकेला महत्त्व देत नाही. त्यांना माझा युक्तिवाद कधीच नाकारता आला नाही. मी काहीही केलं तरी माझ्यावर टीका करणे, माझा धिक्‍कार करणे किंवा माझी निंदा करणे, मी सांगत असलेल्या बाबींची मोडतोड करणे, चुकीचे वर्णन करणे आणि त्याचे विकृतीकरण करणे एवढेच त्यांना माहीत आहे. मी केलेल्या कोणत्याही गोष्टीने काँग्रेस प्रेसला आनंद होत नाही.’ अशा शब्दांत बाबासाहेबांनी काँग्रेसी विचारांच्या वर्तमानपत्रांना फटकारले होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उत्तम पत्रकार, संपादक म्हणून ओळख अगदी ठळकपणे होणे आवश्यक आहे. अनेक क्षेत्रात त्यांनी उत्तुंग कार्य केले असले, तरी पत्रकारितेतील त्यांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे. पण ,संपादक बाबासाहेब आंबेडकर अशी मांडणी खूप कमी वेळा होताना दिसते. आंबेडकरांचा राजकीय पटलावर उदय झाल्यानंतर त्यांनी अस्पृश्यांच्या हक्‍कांसाठी लढा उभारला. समाजातल्या एका मोठ्या महत्त्वाच्या वर्गाला मिळत असलेल्या अमानुष वागणुकीच्या विरोधात त्यांनी बंड केले. प्रस्थापित व्यवस्थेला याचा जाब विचारत त्यांनी अनेक पातळ्यांवर संघर्ष सुरू ठेवला. खरं तर बाबासाहेब राष्ट्रीय नेते होते. प्रचंड मोठा आवाका आणि विलक्षण आकलन असलेले संघर्ष आणि स्वकर्तृत्त्वातून पुढे आलेले ते नेते होते. पण, त्या काळातील मुख्य प्रवाहातील माध्यमांनी बाबासाहेबांना देशाचा नेता न मानता त्यांचा उल्‍लेख अस्पृश्यांचा नेता असा केला. त्याहीपलीकडे जाऊन एका जातीचा नेता म्हणून त्यांची संभावना करणे सुरू ठेवले. माध्यमातील जातवर्चस्वाचा अगदी प्रारंभीच्या काळात बाबासाहेबांना बसलेला हा सर्वात मोठा फटका होता. एवढेच नाही, तर बाबासाहेबांना त्या काळातील प्रस्थापित वर्तमानपत्रातून कमीत कमी प्रसिद्धी दिली जात होती. दलित चळवळीला वाहिलेल्या ‘समाथुवम’ (समानता) या तामिळ नियतकालिकाच्या १७ व्या अंकाच्या संपादकीयात यावर भाष्य करण्यात आले आहे. मद्रास प्रांतात येणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांना समकालीन तामिळ वर्तमानपत्रे भरभरून प्रसिद्धी देत होती. पण, बाबासाहेब मद्रासमध्ये आले तर ही वर्तमानपत्रे त्यांना जागा देत नसत. त्यांची भाषणेही त्रोटक प्रसिद्ध करत असत. माध्यमांचाही एक अजेंडा असतो. तो सेट केलेला असतो. कोणाला किती प्रसिद्धी द्यायची, याची गणितं पक्‍की असतात. कोणाला का टाळायचं, याचा गृहपाठही पक्‍का असतो. बाबासाहेबांच्या बाबतीत तेच झालं. त्यांना एकतर एका जातीचा नेता संबोधलं आणि दुसर्‍या बाजूला त्यांना कमीत कमी प्रसिद्धी मिळेल, अशी व्यवस्था केली. याच्या मुळाशी पुन्हा आपली जाती व्यवस्था आहे. ती माध्यमात नसते, असं म्हणणं आपली स्वतःची फसवणूक करून घेण्यासारखं ठरेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात मूलगामी राजकीय संकल्पना रूजविण्यात मोठी भूमिका बजावली. बाबासाहेबांचे संपूर्ण आयुष्य विचारात घेतले ,तर राजकारण नेमके कुणासाठी करायचे, याचे उत्तर त्यातून मिळते. समाजातील खूप मोठा वर्ग वगळून राजकीय प्रक्रिया पुढे घेऊन जाता येणार नाही, याची जाणीव त्यांनी उर्वरित भारतीय समाजाला करून दिली. सर्वांना समान संधी आणि सर्वांसाठी एकच न्याय या तत्त्वावर त्यांचे राजकारण बेतलेले होते. हीच भूमिका सातत्याने त्यांच्या पत्रकारितेतून व्यक्‍त होत राहिली. अस्पृश्यांची राजकीय प्रेरणा, जातीय हिंसाचाराला केलेला कडाडून विरोध, राजकीय  प्रतिनिधित्व आणि धार्मिक कट्टरवाद्यांनी केलेले दोनहात अशा काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर बाबासाहेबांनी पत्रकारितेच्या माध्यमातून भर दिला होता. आपले म्हणणे मांडण्यासाठी त्यांनी अत्यंत कठोर भाषेचा उपयोग केला. बाबासाहेबांनी लिहिलेले अग्रलेख नजरेखालून घातले ,तर त्यांच्या भाषेचा बाज लक्षात येईल. ते स्वतः इंग्रजीत विचार करत असत. इंग्रजीत लिहून नंतर त्याचे मराठीत भाषांतर करत. पण, हे भाषांतर मूळ भाषेत विचार केल्यासारखे असे. प्रतिस्पर्ध्यावर टीका करताना त्यांनी कसलीही कसर सोडली नाही. अनेक ठिकाणी त्यांनी टोकाची भाषा वापरली. अस्पृश्य समाजावरील अन्याय पाहून संतप्‍त झाल्याने त्यांचा हा अंगार भाषेतून अभिव्यक्‍त होत राहिला. स्पष्ट, परखड आणि तितकीच आक्रमक भाषा वापरून त्यांनी अस्पृश्य बांधवांमध्ये चेतना जागृत केली. त्याचवेळी बाबासाहेबांच्या भूमिकांवर आक्षेप घेत प्रतिस्पर्धी वर्तमानपत्रेही त्यांच्यावर टीका करीत होती.

सन १९२० नंतर बाबासाहेबांना वर्तमानपत्रासारखे स्वतःचे माध्यम मिळाल्यामुळे त्यांची भूमिका तपशीलाने लोकांपर्यंत पोहोचू लागली. सुरुवातीच्या काळात अनेक वर्तमानपत्रे बाबासाहेबांकडे एकतर दुर्लक्ष करायचे किंवा जाता जाता त्यांची दखल घेतली जायची. अस्पृश्यांच्या प्रश्‍नांची चर्चा होणे तर सोडाच, पण अस्पृश्यांच्या संदर्भात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींची दखलही त्या काळची वर्तमानपत्रे नीट घेत नसत. १९१९ मध्ये बाबासाहेबांनी साऊथबरो कमिटीसमोर अस्पृश्यांसमोरील अडचणींचा पाढा वाचला. या मोठ्या समूहाच्या न्याय हक्‍कांची चर्चा त्यांनी तेथे केली. त्या काळातील ब्राह्मणेतर पक्षाचे पुढारी भास्करराव जाधव यांनी बाबासाहेबांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला. पण अन्य राजकीय पक्ष तसेच नेत्यांकडून त्यांना पाठबळ मिळाले नाही. किंबहुना त्या काळातील वर्तमानपत्रांनीही ही बाब अनुल्‍लेखाने मारली. यातून बाबासाहेबांच्या मनात आपली भूमिका मांडण्यासाठी वर्तमानपत्रासारखे एखादे विचारपीठ असावे, अशी कल्पना आली आणि पुढे १९२० मध्ये ‘मूकनायक’चा जन्म झाला. ‘मूकनायक’चा जन्म होण्याच्या आधी बाबासाहेबांना समकालीन वर्तमानपत्रांकडून अनेक अपमान पचवावे लागले होते. अन्य समाजघटकांकडून जसा अस्पृश्य वर्ग बहिष्कृत केला जात होता, तसाच वर्तमानपत्रांकडूनही केला गेला होता. यातून वर्तमानपत्राची निकड निर्माण झाली.

बाबासाहेब ज्या काळात पत्रकारितेत आले, तो काळ मुद्रित माध्यमांचा होता. वर्तमानपत्रे, नियतकालिके आदी छापील माध्यमे प्रभावी असण्याचा तो कालखंड होता. उच्च मानल्या जाणार्‍या जात समूहांच्या हाती मुद्रित माध्यमांची धुरा होती. त्यामुळे त्या त्या समूहाच्या हितसंवर्धानाच्या पलीकडे असलेल्या अन्य समूहाचा फारसा विचार होत नव्हता. काही अपवाद वगळता पत्रकारितेला जातीयतेचा दुर्गंध प्रारंभीपासूनच आहे. शिवाय, त्या त्या काळातील राजकीय व्यवस्थेचाही प्रभाव समकालीन माध्यमांवर होता. व्यवस्थेच्या विरोधात जाणारी माध्यमे अपवादानेच आढळतात. बाबासाहेब सार्वजनिक जीवनात सामाजिक काम करत होते, त्या काळात काँग्रेस बलाढ्य शक्‍ती होती. निर्णय प्रक्रियेवर काँग्रेसचा वरचष्मा होता. गांधीजींच्या काँग्रेसला त्या काळातील वर्तमानपत्रे झुकते माप देत होती. बाबासाहेब काँग्रेसी विचारधारेपेक्षा वेगळी मते मांडत असत. त्या मतांना तितकी प्रसिद्धी दिली जात नसे. पत्रकारितेची ही आणखी एक खोड आहे. अगदी

सुरुवातीपासूनची. आपल्याला सोईचे नसणारे विचार एकतर टाळायचे किंवा नकारात्मक पद्धतीने मांडायचे, ही एक रित झाली आहे. पत्रकारिता तशी पहिल्यापासून कधी निकोप वगैरे नव्हती. आणि तशी ती नसतेही. करताही येत नाही. कुठल्या ना कुठल्या विचार प्रवाहाशी ती जोडलेली असते. विचारप्रवाहाशी पत्रकारिने जोडून घेण्यात अजिबात काही गैर नाही. पत्रकारितेने भूमिका घेतलीच पाहिजे. पत्रकारिता तटस्थ राहिली ,तर अवघड होऊन बसेल. पण ,भूमिका घेणे म्हणजे इतरांच्या भूमिका नाकारणं असा अर्थ होत नाही. प्रत्येकाला भूमिका घेण्याचा आणि ती निःसंकोचपणे मांडण्याचा अधिकार आहे. माध्यमांनी अशा भूमिकांचं स्वागत केलं पाहिजे. ती भूमिका मान्य नाही, असं ठणकावलंही पाहिजे. पण, कोणाचा भूमिका मांडण्याचा हक्‍क हिरावून घेता कामा नये, अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. बाबासाहेबांच्या बाबतीत मात्र ही अपेक्षाही पूर्ण होऊ शकली नाही. काँग्रेसची विचारधारा मान्य असणारी वर्तमानपत्रे बाबासाहेबांच्या भूमिकेला नेहमी विरोध करत राहिली. १८ जानेवारी १९४३ रोजी बाबासाहेबांनी अशा वर्तमानपत्रांचा चांगलाच समाचार घेतला होता. या वर्तमानपत्रांना त्यांनी ‘काँग्रेस प्रेस’ असे संबोधले होते. ‘काँग्रेस प्रेस मला चांगली माहीतआहे. मी त्यांच्या टीकेला महत्त्व देत नाही. त्यांना माझा युक्तिवाद कधीच नाकारता आला नाही. मी काहीही केलं तरी माझ्यावर टीका करणे, माझा धिक्‍कार करणे किंवा माझी निंदा करणे, मी सांगत असलेल्या बाबींची मोडतोड करणे, चुकीचे वर्णन करणे आणि त्याचे विकृतीकरण करणे एवढेच त्यांना माहीत आहे. मी केलेल्या कोणत्याही गोष्टीने काँग्रेस प्रेसला आनंद होत नाही.’ अशा शब्दांत बाबासाहेबांनी काँग्रेसी विचारांच्या वर्तमानपत्रांना फटकारले होते. अस्पृश्यांच्या चळवळीकडे पाहण्याचा तत्कालीन वर्तमानपत्रांचा दृष्टिकोन यातून समोर येतो. त्याचबरोबर बाबासाहेबांना सार्वजनिक क्षेत्रात काम करत असताना माध्यमांनी दिलेल्या सापत्नभावाचाही अंदाज यातून येतो.

बाबासाहेबांनी केलेल्या आंदोलनाला त्या काळातील उच्चजातीय वर्तमानपत्रे सत्याग्रह मानायला तयार नव्हती. काँग्रेसच्या वतीने होणारी आंदोलने मात्र या वर्तमानपत्रांच्या नजरेतून सत्याग्रह आसायचा. पण ,महाड येथील लोकशाही मार्गाने झालेले आंदोलन किंवा नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशाचे शांततामय मार्गाने झालेले आंदोलन प्रस्थापित वर्तमानपत्रांसाठी सत्याग्रह नव्हता. उलट ,अस्पृश्यांच्या संदर्भातील काही मत मांडले तर या वर्तमानपत्रांसाठी ते भारतीय समाजाच्या विरोधातील मत वाटायचे. समाजाची वीण उसवली जातेय, अशा भावनेतून ही वर्तमानपत्रे बाबासाहेबांवर टीका करत असत. माध्यमातील जातवर्चस्वाचा मुद्दा याठिकाणी सर्वात महत्त्वाचा आहे. तेव्हाची स्थिती आणि आजची स्थिती यात काही बदल झाले असले ,तरी आजही माध्यमांची धुरा उच्च जातींकडेच आहे. कनिष्ठ जाती माध्यमांच्या परिघापासून काहीशा दूर आहेत.

जागतिकीकरण, नवीन तंत्रज्ञान, डिजिटल साधने अशा प्रगतीच्या मोठमोठ्या उड्या आपण घेतल्यानंतर समाजातील दुर्बल घटकांची माध्यमांतील स्थिती मजबूत होणे अपेक्षित होते. पण, त्यामध्ये दखलपात्र बदल झाली नाही. ‘हू टेल्स अवर स्टोरीज मॅटर ः रिप्रेझेंटेशन ऑफ मार्जिनालाईज्ड कास्ट ग्रूप इन इंडियन न्यूजरूम’ हा ऑक्सफाम इंडियाचा अहवाल यावर प्रकाशझोत टाकतो. देशातील महत्त्वाची हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रे, नियतकालिके, वृत्तवाहिन्या आणि डिजिटल माध्यमांतील १२१ न्यूजरूमचा अभ्यास केला.  मुख्य संपादक, व्यवस्थापकीय संपादक, कार्यकारी संपादक, ब्युरो चीफ अशा निर्णय प्रक्रियेतील महत्त्वाच्या पदांवर उच्च जात समूहातील १०६ जण आहेत. यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा एकही उच्चपदस्थ व्यक्‍ती नाही. इंग्रजी वृत्तवाहिन्यांमध्ये निर्णय प्रक्रियेतील महत्वाच्या पदांवरील ८९ टक्के लोक खुल्या गटातील आहेत. सहा इंग्रजी आणि सात हिंदी वृत्तपत्राच्या अभ्यासातून समोर आलेली बाब म्हणजे, या वर्तमानपत्राचे नेतृत्त्व करणारा एकही व्यक्‍ती कनिष्ठ जातीतील नाही. वर्तमानपत्रातील लेख लिहिणार्‍यांमध्येही सर्वाधिक उच्च जातीय लेखक आहेत. डिजिटल माध्यमे सर्वांसाठी खुली असल्याने यामध्ये सर्व जातसमूहांना संधी मिळेल, असे अनेकांना वाटते. पण, तशी स्थिती नाही. देशातील प्रमुख सात डिजिटल प्लॅटफॉर्मचा अभ्यास केल्यानंतर त्यामध्ये प्रमुख पदावर ८४ टक्के लोक खुल्या प्रवर्गातील असल्याने स्पष्ट झाले. देशभरातील १२ प्रमुख नियतकालिकांच्या अभ्यासातून ओबिसी घटकांना काही प्रमाणात निर्णय प्रक्रियेत स्थान मिळाल्याचे समोर आले. ही काहीशी समाधानाची बाब आहे. परंतु, याठिकाणीही अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना काहीही स्थान नाही. या अभ्यासातून आलेले निष्कर्ष निश्‍चितपणे विचार करायला लावणारे आहेत. माध्यमांतील जातवास्तवावर यातून प्रकाश पडला. सगळीकडे अशीच स्थिती आहे, असे नाही. परंतु व्यापक विचार करता माध्यमात कनिष्ठ जातींचे प्रतिनिधित्व कमी आहे, हे कोणीही मान्य करेल. यामध्येही निर्णय प्रक्रियेतील त्यांचा सहभाग दुय्यम आहे. मुस्लीम, ख्रिश्‍चन, पारसी, आदिवासी, तृतीयपंथी आदी समाजघटकही माध्यमांमध्ये अपवादाने आढळतात. भारतीय माध्यमांचे लोकशाहीकरण करणे या अर्थाने आवश्यक आहे. समाजातील सर्व घटक माध्यमात सक्रिय झाले ,तर समाजाचे वस्तुनिष्ठ प्रतिबिंब माध्यमांत उमटेल. यातून एक निकोप व्यवस्था निर्माण होण्यास मदत होईल.

 प्रा. शिवाजी जाधव, कोल्हापूर

(shivaji.jadhav16@gmail.com)


       
Tags: babasahebambedkarbjpcastiesmCongressmedia
Previous Post

शोधाची नवी वाट : थेरीगाथा नवे आकलन

Next Post

बाबासाहेब आणि सिद्धार्थ महाविद्यालय

Next Post
बाबासाहेब आणि सिद्धार्थ महाविद्यालय

बाबासाहेब आणि सिद्धार्थ महाविद्यालय

वंचीत बहुजन आघाडी – शिवसेना युतीचे कार्यकर्त्यांकडून स्वागत
बातमी

वंचीत बहुजन आघाडी – शिवसेना युतीचे कार्यकर्त्यांकडून स्वागत

पुणे : वंचित बहुजन आघाडी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या युतीची घोषणा होताच पुण्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन ...

January 23, 2023
वंचित –सेना युती नव्या पर्वाच्या राजकीय अध्यायाचा आगाज – राजेंद्र पातोडे
राजकीय

वंचित –सेना युती नव्या पर्वाच्या राजकीय अध्यायाचा आगाज – राजेंद्र पातोडे

काहीही हातचे राखून न ठेवता एकूण एक प्रश्नांची उत्तरे देत आज डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन दादर येथे वंचित आणि शिवसेना ...

January 23, 2023
वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना युतीचे संयुक्त निवेदन
बातमी

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना युतीचे संयुक्त निवेदन

आम्ही एकत्र का आलो? देशाची राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस अधोगतीकडे जाताना दिसत आहे. लोकशाही स्वातंत्र्याची गळचेपी करत देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू ...

January 23, 2023
ख्रिस्ती बांधवांच्या निषेध मोर्चाला वंचीतचा पाठिंबा; अंजलीताई आंबेडकरांचे संबोधन
बातमी

ख्रिस्ती बांधवांच्या निषेध मोर्चाला वंचीतचा पाठिंबा; अंजलीताई आंबेडकरांचे संबोधन

ख्रिस्ती समाजावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये 13 जानेवारी 2023 रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालया वरती ख्रिश्चन बांधवांनी काढलेल्या निषेध मूक महामोर्चाला ...

January 14, 2023
मा. अशोकभाऊ सोनोने यांची हिंगोली जिल्हा कार्यालयाला भेट
बातमी

मा. अशोकभाऊ सोनोने यांची हिंगोली जिल्हा कार्यालयाला भेट

भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते मा.अशोकभाऊ सोनोने आज हिंगोली येथे आले असता वंचित बहुजन ...

January 14, 2023
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क