ॲड. प्रकाश आंबेडकर : लातूर मतदरसंघांत प्रचार सभा
लातूर : औरंगजेबाचं स्टेटस पोरांनी ठेवलं त्यावेळी तुमच्या बाजूने काँग्रेस होती का ? देशमुख कुटुंब तुम्हाला वाचवायला आले होते का ? नाना पटोले आले होते का ?
वंचित बहुजन आघाडीने औरंगजेबाच्या मजारवर चादर चढवली आणि आवाहन केले की, हिंमत असेल तर आमच्यावर गुन्हे दाखल करा, मुस्लिमांवर काय गुन्हे दाखल करता? असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी लातूर येथील सभेत केले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नरसिंहराव उदगीरकर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
काही मुस्लीम मला म्हणतात, तुम्ही काँग्रेससोबत गेला नाहीत. मी म्हणतो की, अरे एकही तिकीट मुस्लिमांना काँग्रेसने दिले नाही त्याची फिकीर पहिल्यांदा करा असे आवाहन त्यांनी मुस्लीम समुदायाला केले.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, लोकसभा निवडणुकांची मतमोजणी जेव्हा होईल, तेव्हा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाराष्ट्रातील सर्वांत प्राबल्य असणारा पक्ष असेल, हे खात्रीने सांगतो. भंडारा – गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार आणि काँग्रेस उमेदवार हे नात्यातले आहेत. लोकांनी त्यांना विचारलं आहे की, तुम्ही मॅच फिक्सिंग का करत आहात ? यामुळे सत्तेत बदल होत नाही, सत्ता ही कुटुंबात राहते आणि म्हणून लोकांचे प्रश्न मिटत नाही. घराणेशाहीचे राजकारण जोपर्यंत आपण मोडत नाही, तोपर्यंत आपला विकास होत नाही हे लक्षात घ्या.
मोदी सरकारने राफेलची खरेदी फ्रान्सकडून केली. त्याच्यासंदर्भातली नवीन माहिती समोर यायला लागली आहे. हे राफेल डेसाल्ट नावाच्या कंपनीने निर्माण केले आहे. या कंपनीने आपला वर्षभराचा अहवाल फ्रान्स सरकारला सादर केला तेव्हा त्यांना असे आढळले की, या ठिकाणी डेसाल्टच्या अधिकाऱ्याने ही विमाने विकावित यासाठी टक्केवारी दिली. फ्रान्स सरकारने याची चौकशी केली त्यातील दोन अधिकाऱ्यांना दोषी ठरवले आणि त्यांना पाच वर्ष शिक्षा झाली. देणाऱ्याला शिक्षा झाली आता घेणारे भारतीय आहेत. मोदीच्या टीममधील आहेत. आम्ही मोदींना विचारतो की, तुम्ही चौकशी का केली नाही ? असा सवाल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला.