– आकाश मनीषा संतराम
स्थळ परभणी. 10 डिसेंबर 2024. मंगळवारचा दिवस होता. पूर्वेला सूर्याची लाली आली होती. कुणी कामावर जाण्याच्या घाईत होतं तर बाया माणसं स्वयंपाक करण्यात व्यस्त होती. सगळी माणसं कामाला गेली. घरातली चिलीपिल्ली शाळेत गेली. एव्हाना सूर्य डोक्यावर आला होता. रस्ते सुनसान होते. पण काय जागरूक माणसं जबाबदार नागरिक म्हणून सजग होती आपापल्या कामात व्यस्त होती. तेवढ्यात संविधान चौकात एक समाजकंटक बाबासाहेब आणि संविधान स्मारकाकडे जाऊन विटंबना करीत होता. जबाबदार नागरिकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला पण जातीय द्वेषाने त्याने संविधानाची विटंबना केली. देशातील तमाम भारतीयांना न्याय – हक्क प्रदान करणाऱ्या आणि माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार देणाऱ्या भारतीय संविधानाच्या प्रतिमेच्या काचेची तोडफोड केली. भारतीय संविधान म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान म्हणजे न्याय, संविधान म्हणजे समता, बंधुता आणि स्वातंत्र्य या संविधानाची देशात विटंबना करणे म्हणजे या आदर्श तत्वांना विरोध करणे. संविधानाला विरोध म्हणजे देशाला विरोध. अशा देशद्रोही माणसाने संविधानाची विटंबना केली आणि समाजातील सलोख्याला तडा गेला.
सामाजिक सलोख्याला तडा जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. बाबासाहेबांचे पुतळे आणि संविधान यावर आघात करून अशी सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचं काम या देशात अनेक वर्षांपासून चालत आले आहे. आता तर खुद्द देशाचे गृहमंत्री असणारे अमित शहा यांनी सुद्धा बाबासाहेबांना विरोध करण्याची सुरुवात संसदेतून केल्याचे दिसते. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर ही फॅशन झालीय आणि या नावापेक्षा देवाचे नाव घ्या स्वर्ग प्राप्ती होईल, असे म्हणत त्यांनी विज्ञानाला फाट्यावर मारण्याचे काम केले. 2014 साली भाजप सत्तेत आली त्यानंतर 2018 मध्ये दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर संविधान जाहीरपणे जाळण्यात आले. अनेक वेळा भाजप नेत्यांनी संविधान बदलण्याची भाषा केली. त्यात मागील काही दिवसांपूर्वी कुंभमेळ्यात नवीन संविधान देखील निर्माण केल्याच्या बातम्या माध्यमांवर झळकत होत्या. हे सगळ कश्यासाठी, तर इथल्या तळागाळातील शोषित, वंचित आणि उपेक्षितांनी सत्तेचा वाटा मागू नये, इथल्या राजकारणावर, समाजकारणावर आणि अर्थकारणावर त्यांचा प्रभाव असू नये याचसाठी. संविधान निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजात अन्यायाच्या विरुद्ध बंड करण्याची ताकद दिली. व्यवस्थेने नाकारलेल्या माणसांना संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी तारण्याचे काम केले. मतदानाच्या माध्यमातून मोठ मोठ्या तुर्रम खानांना घरी बसवण्याचे आणि सत्तेत बसवण्याचा अधिकार दिला. सत्तेचे स्वप्न महालापासून ते झोपडीपर्यंत येऊन ठेपले.
अहो, संविधानाची किमया बघा झोपडीतले सुद्धा महालात राहू लागले. वर्ण व्यवस्थेनुसार ब्राम्हण, क्षत्रीय, वैश्य आणि शूद्र असे चार वर्ण ज्या वर्णाला पायऱ्याच नाहीत. म्हणजे लायक माणूस जरी शूद्र म्हणून जन्माला आला, तरी त्याला शूद्रचं ठरवलं जात होतो. या वर्णव्यवस्थेला भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 नुसार सुरुंग लावण्याचे बाबासाहेबांनी काम केले आणि समतेचा स्वीकार करण्यात आला. ही समता तर अनेकांच्या डोळ्यात आजही सलते, कारण झोपडीतली माणसं महालात जाऊ लागले, मोठ मोठ्या पदांवर विराजमान झाले आणि व्यवस्थेच्या गैर कारभाराच्या विरोधात आवाज उठवू लागले.
परभणी घटनेनंतर या शहरात तसेच जिल्ह्यातील पाथरी आणि जिंतूर या ठिकाणी देखील तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक ठिकाणी निदर्शनं सुरू होती. काही ठिकाणी टायर जाळून निषेधही नोंदवण्यात आला, तर काही ठिकाणी गाड्यांची तोडफोड देखील करण्यात आली. शहरात रस्ता रोको आंदोलन केले. या घटनेच्या आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी हीच मागणी त्या आंदोलकांची होती. मात्र, परभणी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि आंदोलकांना ताब्यात घेतलं. काही कार्यकर्त्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले. यावेळी एक घटना घडली. ती म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत मृत्यू झाला. कोठडीत मृत्यू म्हणजे पोलिसांच्या जबर मारहाणीत सूर्यवंशी यांना आपला जीव गमवावा लागला. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये सोमनाथ सुर्यवंशी यांना ताब्यात घेतलं होतं. प्रथम माहितीनुसार, सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाच्या छातीत कळ आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्यावेळी त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. आता शवविच्छेदनाच्या अहवालातून Shock following multiple injuries हे कारण समोर आल्यामुळे अनेक राजकीय नेत्यांचा आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांचा खोटारडेपणा उघडकीस आला.
पोलीस कोठडीमध्ये सोमनाथ सुर्यवंशी यांचा झालेला मृत्यूची गंभीर बाब सत्ता हातात असल्याने आपणं सहजच दुर्लक्षित करु अशा अविर्भावात मनुवादी चाली वर चाली खेळताना दिसले. त्यात पहिल्यांदाच पोलीस खात्याने जाहीर केले की, सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाला आणि कहर म्हणजे राज्याचे प्रथम नागरिक म्हणजेच मुख्यमंत्री यांनी सभागृहात खोटं बोलून सांगितले सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू श्वसनाचा आजाराने झाला. त्यात भर म्हणून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आंबेडकरी जनतेने काढलेल्या लाँग मार्चमध्ये येऊन, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्या पोलिसांना माफ करावे असे गाढवपणाचे वक्तव्य केले. आता न्यायची अपेक्षा कोणाकडून करावी, या प्रश्नाची चर्चा आंबेडकरी आणि संविधानवादी जनतेमध्ये सुरू झाली. सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख या दोघांनाही न्याय मिळायला पाहिजेत. मात्र न्याय मागत असताना आमदार धस यांच्याकडून दूजाभाव झाल्याचे दिसले. म्हणजे, दलितांचे किंवा आंबेडकरी जनतेचे मरण स्वस्त आहे का ? जेवढा जोर देशमुख यांच्या न्यायासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून लावला जात आहे, मग सोमनाथ सूर्यवंशी यांनी काय गुन्हा केला होता ? त्यांचा गुन्हा एवढाच की, ज्या संविधानाच्या नावावर तुम्ही सत्तेसाठी दारोदार जाऊन मते मागितली, त्याच संविधानाची विटंबना झाली म्हणून सूर्यवंशी यांनी त्याचा निषेध केला. अनेक राष्ट्रीय पातळीवरचे नेते आले आणि ठरलेले फोटो सेशन करून गेले. त्यानंतर सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांच्या न्यायासाठी ब्र शब्द आजतागायत कोणी काढला नाही. त्याच राष्ट्रीय पक्षाचा एक नेता न्याय मागणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचं काम हत्ती एवढ्या बाता मारत माध्यमांच्या समोर करत होता. यांना न्यायाचं काय, असे विचारले तर हेच मुग गिळून गप्प बसतात.
अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील एकही नेता, एकही विरोधी पक्ष, तथा एकही पॅंथर ग्राऊंडवर मदतीसाठी किंवा परभणी संविधान शिल्प तोडफोड प्रकरणी पुढे आला नाही, सगळे नुसती बघ्याची भुमिका घेतं होते.पण वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर हे मात्र या घटनेकडे सुरुवातीपासूनच लक्ष देऊन होते. त्यांनीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत फोनवर बोलून पहिल्यांदा कोम्बींग ऑपरेशन थांबवा ही भुमिका घेतली आणि पोलिसांकडून सुरू असलेला अन्याय थांबवला. कित्येकांची हाडांना मार बसला असता, हातपाय अधू करण्यात आले असते. कित्येक महिला, वृद्ध यांना टार्गेट केले असते. पोलिसांना साधी गरोदर महिला कळली नाही. महिलांना असे मारले की, जणू काय जनावरांना मारत आहेत. सुर्यवंशी यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी परभणीकडे घेऊन जात असताना, पोलिसांनी पाचोड जवळ त्यांचे पार्थिव अडवले आणि लातूर मध्ये अंत्यविधीसाठी जबरदस्ती केल्याचा निंदनीय प्रकार सुद्धा यावेळी करण्यात आला. याची दखल घेत बाळासाहेब आंबेडकरांनीच पोलिस महानिरीक्षकाला संपर्क करून अँब्युलन्स परभणीच्या दिशेने वळवली. त्यानंतर संपूर्ण अंत्यविधी पार पडेपर्यंत बाळासाहेब परभणीत ठाण मांडून होते. याच त्यांच्या भूमिकेमुळे शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांचा विश्वास बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर आहे. बाळासाहेब आंबेडकरचं आम्हाला न्याय मिळवून देतील अशी त्यांची भावना आहे. बाळासाहेब आंबेडकर सुद्धा सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्यासाठी कायदेशीर लढा लढत आहेत.
सूर्यवंशी कुटुंबियांना न्याय पाहिजे आहे आणि म्हणून ते सुद्धा स्वाभिमानी बाण्याने लढताना दिसत आहे. पोलिस प्रशासन असो किंवा राज्य सरकार यांनी त्यांना आमिष द्यायचा प्रयत्न केला, पण सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने त्यांच्या या आमिषाला भीक घातली नाही. लाँग मार्च हा निघाला न्यायासाठी मान्य आहे, पण गणित चुकलं कुठं ? धस सारखा एक आमदार येतो आणि पोलिसांना माफ करा असे बोलून प्रकरणावर पडदा टाकायचं काम करतो आणि लगेच लाँग मार्च गुंडाळण्यात येतो तेव्हा या लाँग मार्चला राजकारणाचा वास लागला काय, याची चर्चा होणे स्वाभाविकच आहे. असो, आंबेडकरी चळवळीत चळवळीच्या नावाने घरे भरणारे आणि आंदोलनाचा सौदा करणारे कमी नाहीत आणि चळवळीला हे नवीनही नाही. पण ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासारखे नेतृत्व ठामपणे सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी लढा देत आहेत. त्यामुळे सुर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळेलचं असा विश्वास आहे.
ॲड. आंबेडकर यांनी केलेला पाठपुरावा-
– सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला, त्यावेळी त्यांच्या फॉरेन्सिक पोस्टमार्टमची मागणी आंबेडकरांनी केली.
– या प्रकरणी सूर्यवंशी यांना न्याय देण्यासाठी लढणाऱ्या फुले, शाहू, आंबेडकरवादी वकिलांच्या टीमला मार्गदर्शन आणि कायदेशीर मदत करण्याचे काम ॲड. आंबेडकर करत आहेत.
– सूर्यवंशी यांचे पार्थिव घेऊन येणाऱ्या अँब्युलन्सला लातूर या ठिकाणी अडवण्यात आले, तेव्हा पोलिस महानिरीक्षक आणि पोलिस अधीक्षक यांना संपर्क करून या बाबत जाब विचारून, अँब्युलन्स परभणीच्या दिशेने बोलावली.- सूर्यवंशी यांच्या अंत्यविधीत कोणतीही बाधा येऊ नये, तसेच त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ॲड. आंबेडकर हे सुरुवातीपासून ते अंत्यविधी पार पडेपर्यंत अंत्ययात्रेत सहभागी होते.
– सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 1 कोटीचे आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून तशी मागणी ॲड. आंबेडकरांनी केली.- तसेच या भेटीत त्यांनी या प्रकरणाची निःपक्षपातीपणे चौकशी आणि दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली.
– सूर्यवंशी कुटुंबीयांनी सुद्धा ॲड. आंबेडकर यांची अकोल्यातील यशवंत भवन या निवासस्थानी भेट घेतली आणि ॲड. आंबेडकरच आम्हाला न्याय देतील असा विश्वास व्यक्त केला.
– सरकारकडून अपेक्षित मदत सूर्यवंशी कुटुंबियांना मिळाली नाही, सरकार देत असलेली मदत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने नाकारली. वंचित बहुजन आघाडीकडून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांचे अर्थ सहाय्य करण्यात आले. तसेच आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.