अकोला : अकोला महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने आपले पूर्ण बळ झोकून दिले आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने जोरदार मुसंडी मारत आपली स्वतंत्र राजकीय ताकद सिद्ध केली होती. त्या यशानंतर आता महानगरपालिका निवडणुकीत पक्ष अधिक आक्रमक भूमिकेत उतरला असून, या निवडणुकीकडे केवळ अकोलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाचे युवा नेते सुजात आंबेडकर उद्या, ५ जानेवारी २०२६ रोजी अकोला शहराच्या दौऱ्यावर येत असून, ते एकाच दिवशी सहा विविध प्रभागांमध्ये प्रचार सभा आणि मतदारांशी संवाद साधणार आहेत. ही सभा अकोला जिल्ह्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या सहा प्रभागात प्रचार दौरा होणार आहे.
सायंकाळी ५ वाजता सभेला प्रारंभ होणार आहे. सुजात आंबेडकर यांच्या या झंझावाती दौऱ्याची सुरुवात सायंकाळी ५:०० वाजता प्रभाग क्रमांक १६ मधील शास्त्री नगर येथून होईल. त्यानंतर लगेच ५:३० वाजता ते प्रभाग क्रमांक ९ मधील भिमनगर येथे उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. सायंकाळी ६:३० वाजता प्रभाग क्रमांक ३ मधील पंचशील नगर (खरप) येथे त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
रात्री उशिरापर्यंत चालणार प्रचाराचा धडाका
शहरातील विविध भागांत मतदारांच्या गाठीभेटी घेत सुजात आंबेडकर रात्री ८:०० वाजता प्रभाग क्रमांक १३ मधील शिवर येथे पोहोचतील. त्यानंतर ८:३० वाजता प्रभाग क्रमांक १४ मधील जेतवन नगर (शिवणी खदान) आणि रात्री ९:१५ वाजता प्रभाग क्रमांक १४ मधीलच जुने गाव मलकापूर येथे त्यांच्या दौऱ्याची सांगता होईल.
अकोला हा वंचित बहुजन आघाडीचा बालेकिल्ला असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुजात आंबेडकर स्वतः मैदानात उतरल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. या दौऱ्यामुळे अकोल्यातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता असून, वंचित बहुजन आघाडी शहरात आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे.






