सोलापूर : “भाजपने आतापर्यंत कोणतेही विकासकाम केलेले नाही, फक्त स्वतःच्या तिजोऱ्या भरण्याचे काम केले आहे. सोलापूर शहराची आजची दुरवस्था या प्रस्थापितांमुळेच झाली आहे. आता वेळ आली आहे की, भाजपचा पराभव करून त्यांना घरी बसवावे आणि खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला संधी द्यावी,” असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केला.
वंचित बहुजन आघाडी चे सर्व अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ, युवा नेते सुजात आंबेडकर यांची भव्य जाहीर सभा आज झाली. वंचित बहुजन आघाडीने सोलापूर महानगरपालिकेसाठी कंबर कसली असून, आज दुपारी ३ वाजता सोलापूरमधील मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर (जुना बस डेपो) येथे पहिली जाहीर सभा पार पडली.

युवकांना ५० टक्के उमेदवारी
सुजात आंबेडकर म्हणाले की, “वंचित बहुजन आघाडी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. ज्यांनी संघर्ष केला, त्यांनाच आम्ही उमेदवारी दिली आहे. गेल्या विधानसभेत ३६ तरुणांना संधी दिल्यानंतर, यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत आम्ही ५० टक्के उमेदवारी युवकांना दिली आहे. वडार, कैकाडी, लिंगायत, मुस्लिम आणि मायक्रो ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम वंचितने केले आहे.”

वंचित बहुजन आघाडीचे ‘सोलापूर व्हिजन’:
१) प्रत्येक घराला नळ आणि नळाला पाणी देण्याचे काम केले जाईल.
२) ३०० बेडचे अत्याधुनिक रुग्णालय उभारून प्रत्येक प्रभागात एक प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले जाईल
३) सरकारी शाळांना सर्वोत्तम दर्जाचे शिक्षण व सोयी-सुविधा देऊन मोफत शिक्षण उपलब्ध करून दिले जाईल
४) एमआयडीसी पुन्हा सुरू करून पाच हजारांहून अधिक युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल
प्रस्थापितांनी सोलापूरला लुटले – सोमनाथ साळुंखे
राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी स्थानिक नेत्यांवर टीका करताना म्हटले की, “ज्या प्रतिनिधींना तुम्ही निवडून दिले, त्यांनी केवळ कंत्राटे मिळवून आपली संपत्ती गोळा केली. आज शहरात पाणी, आरोग्य आणि शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आता पर्याय केवळ वंचितच आहे.”

तीन महिन्यात पाणी प्रश्न सोडवणार – डॉ. नितीन ढेपे
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. नितीन ढेपे म्हणाले की, “वंचित बहुजन आघाडी हा रस्त्यावर उतरून लढणारा पक्ष आहे. आमची सत्ता आल्यास केवळ तीन महिन्यांच्या आत सोलापूरचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवून दररोज पाणीपुरवठा केला जाईल.”
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अधिकृत उमेदवारतआयोजित भव्य जाहीर सभेत वंचित बहुजन आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






