अकोला : अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आपल्या झंझावाती भाषणाने प्रचारात मोठी चुरस निर्माण केली आहे. भीमनगर येथे आयोजित भव्य जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी प्रस्थापित राजकीय पक्षांवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले, “ज्या समाजाला प्रस्थापित पक्षांनी कधीच प्रतिनिधित्व दिले नाही, त्यांना सत्तेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम फक्त ॲड. बाळासाहेब आंबेडकरांनीच केले आहे.”
या सभेला भीमनगर परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती, ज्यामुळे ‘वंचित’च्या प्रचाराला मोठे बळ मिळाल्याचे दिसून येत आहे. तसेच या सभेत नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.

बार्शिटाकळीचा दाखला अन् विकासाची साद
सुजात आंबेडकर यांनी आपल्या भाषणात वंचित बहुजन आघाडीच्या सर्वसमावेशक राजकारणाचे उदाहरण देत ते म्हणाले, “वंचित बहुजन आघाडी हा केवळ पक्ष नसून ती वंचितांची सत्ता मिळवून देणारी चळवळ आहे. बार्शिटाकळी येथे एका मुस्लिम महिलेला नगराध्यक्ष बनवून बाळासाहेबांनी हे सिद्ध करून दाखवले आहे की, वंचित-शोषित समाजाला सत्तेत बसवण्याची जिद्द फक्त आपल्यातच आहे.”

अकोला शहराच्या प्रलंबित प्रश्नांवर बोट ठेवत सुजात आंबेडकर यांनी मतदारांना साद घातली. “अकोला शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर या महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला साथ द्या. ज्यांनी आजवर तुम्हाला फक्त मतपेढी म्हणून वापरले, त्यांना घरी बसवण्याची हीच वेळ आहे,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या भव्य जाहीर सभेला वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भीमनगरमधील या सभेने अकोल्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत दिले असून, वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे.






