औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने आता उच्चांक गाठला असून, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक ७, सिद्धार्थ नगर येथे काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळ आहे.
“शहराच्या आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आता हक्काच्या उमेदवारांना निवडून देण्याची वेळ आली आहे,” असे आवाहन सुजात आंबेडकर यांनी यावेळी केले.

प्रचंड जनसमुदायासह शक्तीप्रदर्शन
सिद्धार्थ नगर परिसरात काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांचा आणि सर्वसामान्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. रॅलीच्या सुरुवातीपासूनच हजारो नागरिक यात सहभागी झाले होते. ‘एकच संधी वंचितला’ अशा घोषणांनी संपूर्ण प्रभाग दणाणून गेला होता. ही रॅली केवळ प्रचाराचे साधन न ठरता वंचित बहुजन आघाडीच्या शक्तीप्रदर्शनात रूपांतरित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

रॅलीदरम्यान सुजात आंबेडकर यांनी विविध ठिकाणी ‘कॉर्नर सभा’ घेतल्या. या सभांच्या माध्यमातून त्यांनी प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधला. “वर्षानुवर्षे केवळ आश्वासनं देणाऱ्यांना बाजूला सारून, आता सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा,” असे त्यांनी नमूद केले.

प्रभागातील रस्ते, पाणी आणि मूलभूत सोयीसुविधांचा अभाव यावर भाष्य करताना सुजात आंबेडकर म्हणाले की, शहराचा विकास करायचा असेल तर वंचित बहुजन आघाडी हाच सक्षम पर्याय आहे. औरंगाबादकरांनी आता बदल घडवण्याचा निर्धार केला असून, या रॅलीला मिळालेला प्रचंड प्रतिसाद हे त्याचेच निदर्शक आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.






