ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा राहुल गांधीच्या वक्तव्यावर निशाणा
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच दिलेल्या एका वक्तव्यात “जातीय जनगणना न होणं ही माझी चूक होती” असे म्हणत एक प्रकारे आपल्या पक्षाच्या ऐतिहासिक अपयशावर झाक घालण्याचा प्रयत्न केला, मात्र वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यावर कठोर ट्विट द्वारे प्रतिक्रिया देत सांगितले की, जातीय जनगणना रोखणं ही चूक नव्हे, हा तर ओबीसी, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांवर केलेला कित्येक दशकांचा गुन्हा आहे.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, राहुल गांधी हा मोठेपणाचा देखावा थांबवा. तुम्ही म्हणता की जातीनिहाय जनगणना न झाल्याची चूक केवळ तुमची आहे आणि त्यामुळे ओबीसींना त्यांचा हक्क मिळाला नाही. राहुल गांधी, सर्वप्रथम हे समजून घ्या की ही चूक नव्हे, तर बहुजनांवर केलेला एक गुन्हा आहे. आणि हा गुन्हा तुमच्या आजी इंदिरा गांधी, तुमचे वडील राजीव गांधी, तुमची आई सोनिया गांधी, तुम्ही स्वतः आणि तुमची काँग्रेस पार्टी या सगळ्यांनी मिळून दशकानुदशके बहुजनांवर केला आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुढील मुद्द्यांकडे लक्ष वेधले –
• तुमच्या आजी इंदिरा गांधी यांनी मंडल आयोगाचा अहवाल १० वर्षे दाबून ठेवला.
• तुमचे वडील राजीव गांधी मंडल आयोग लागू करण्यास आणि ओबीसींना आरक्षण देण्यास विरोधात होते. याचे पुरावे त्यांच्या लोकसभेत दिलेल्या भाषणांमध्ये सापडतात. माझे मित्र आणि तत्कालीन पंतप्रधान वी. पी. सिंग, माझे सहकारी आणि मी मिळून मंडल आयोगाच्या शिफारसी आणि ओबीसींसाठी २७% आरक्षण लागू केलं.
• तुमची आई सोनिया गांधी, ज्या यूपीए आघाडीच्या अध्यक्षा होत्या, त्यांनी यूपीए सरकारमध्ये जातीय जनगणनेचा मुद्दा दाबून ठेवला. २०११ मध्ये समाजवादी पक्षांनी जनगणनेत जात नोंदवण्याची मागणी केली, तेव्हा तुमची काँग्रेस पार्टी आणि तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी या मागणीचा विरोध केला. जातीय जनगणनेची मागणी वाढल्यावर शेवटी हार मानून तुमच्या पक्षाने जनगणना केली, पण आजपर्यंत त्या जनगणनेचे आकडे तुम्ही जाहीर केलेले नाहीत.
राहुल गांधी, ना तुम्ही दलित समाज समजू शकता, ना त्यांच्या समस्या. हीच बाब आदिवासी, ओबीसी आणि भारतातील अल्पसंख्याक विशेषतः मुस्लिम आणि बौद्ध समाज यांच्या बाबतीतही लागू होते. फक्त फोटोशूट करून आणि “जय भीम” ओरडून कोणालाही बहुजनांच्या समस्या समजत नाहीत. आणि हो, पुढच्यावेळी अर्धवट खोटं नाही, तर पूर्ण सत्य बोला !तेही बोला की बहुजनांना वंचित ठेवण्याच्या गुन्ह्यात तुमच्या आजी इंदिरा गांधींपासून, वडील राजीव गांधी, आई सोनिया गांधी, तुम्ही स्वतः आणि तुमची काँग्रेस पार्टी सर्वजण सहभागी आहात.