जरी या वर्तमानाला कळे ना आमुची भाषा,
विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही…
– सुरेश भट
अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानावर लाखोंचा जनसागर जमत होता. तसे आकाशातही काळे ढग जमू लागले होते. पाऊस कधी येईल, याचा काही नेम नव्हता. पण, संघर्ष आमच्या आयुष्याचाच एक अविभाज्य घटक असल्यामुळे उन्हा, पावसात कष्टकरी जनतेसोबतची नाळ कायम ठेवून माणसांच्या कल्याणासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची हिंमत आणि धाडस आम्हाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आहे. आमच्या सर्वहारा माणसांना जनावरांपेक्षाही हीन वागणूक दिली जात होती. त्या माणसांना माणूस म्हणून ओळख देणारे आणि त्यांना माणसात आणणा-या महामानवाचे खरे वारसदार म्हणून उन्हापावसाची तमा न बाळगता, कोणताही बडेजाव न करता परिस्थितीशी दोन हात करून आपल्या माणसांना बळ देणा-या अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत अकोला येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त जंगी सभा झाली. सभा सुरू झाली आणि त्याचवेळी जोरदार पावसाला सुरूवात झाली. आकाशात ढगांचा गडगडाट सुरू होता आणि भर पावसात अॅड. बाळासाहेब आंबेडकरांची सभा लाखोंचा जनसागर कानात प्राण आणून ऐकत होता. ना कुणी छत्री उघडली, ना कुठे चलबिचल झाली. जिथल्या तिथे लाखोंचा जनसागर शांतपणे बाळासाहेब आंबेडकरांचे भाषण ऐकत होता.
आज देशात आणि राज्यातही फार काही रयतेचं राज्य आहे, असं वाटणारी परिस्थिती नाही. सर्वसामान्य माणूस महागाईने बेजार झालेला आहे. सरकार म्हणून ज्यांना मतदारांनी निवडून दिलं आहे, ते सरकारच्या तिजोरीत ठणठणाट असल्याने देश विकायला लागले आहेत. या सगळ््याचा सामना करायचा असेल, तर एकजुट महत्त्वाची आहे, ती कायम ठेवा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यानंतर २०२४ मध्ये विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यावेळी एकजुटीने सहभागी व्हा असे आवाहन बाळासाहेब आंबेडकर करीत होते. आणि टाळ््यांच्या गजरात त्यांना जनता पाठिंबा देत होती.
लोक सत्तेसाठी काय काय करू शकतात, हे गेल्या काही वर्षांत आपण सगळ््यांनी बघितलं असेलच. पण सत्तेचा माज आल्यास कशी परिस्थिती होते, हे आंध्र प्रदेशच्या उदाहरणावरुन दिले. विभाजनापूर्वी तेथे चंद्राबाबूंची सत्ता होती. विभाजन होताच सत्ता गेली. यामुळे एकजुट व्हा आणि सत्ता मिळवा अशी परिवर्तनवादी हाक त्यांनी उपस्थित जनसागराला दिली. देशात आणि राज्यातही पैशाच्या बळावर सत्ता मिळविणे सुरु असल्याने भविष्यात ही हुकुमशाहीची नांदी ठरणार आहे, हा धोकाही त्यांनी बोलून दाखवला. भर पावसातही वैचारीक क्रांतीची धग कायम असल्याचा प्रत्यय क्षणोक्षणी येत होता.
आंबेडकरी चळवळीच्या नावाखाली सत्तेसोबत मांडवली करणा-यांचा खरपूस समाचार बाळासाहेबांनी घेतला. विचारवंत म्हणवून घेणा-यांची संख्या कमी नाही. पण, त्यांनी आंबेडकरी चळवळीच्या नावाखाली खुर्च्या मिळवल्या आहेत. सत्तेसाठी लाचार झालेले लोक खुर्चीला चिकटून आहेत. ते कोण आहेत, ओळखा. आपल्याला सत्ताधारी जमात बनायचं आहे, पण लाचारीने नव्हे. स्वाभिमानाने आणि आत्मसन्मान कायम ठेवून सत्ता मिळविण्याची ताकद आपल्या सोबत असलेल्या बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदार समूहांमध्ये आहे. ही ताकद ओळखून एकजुटीने रहा. आता लगेच ज्या निवडणुका आहेत, त्यात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या बाजूने उभे रहा. २०२४ आपलं आहे, हे ध्यानात ठेवा, असेही बाळासाहेबांनी सांगितले.
भर पावसात कान देऊन ऐकणारे लोक कुणी जवळच्या तालुक्यातून, जिल्ह्यातून आले होते. तर कुणी पर जिल्ह्यातून आणि परराज्यातूनही आलं होतं. यात गेल्या ३८ वर्षांपासून न चुकता सभेला आलेले लोकही होते. अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे ऊजार्दायी भाषण ऐकण्यासाठी ३८ वर्षांपासून शेरा वडनेर (ता. तेल्हारा) येथील ६१ वर्षीय सुभाष अप्पाजी वानखडे अकोल्यात येतात. त्यांनी आतापर्यंत एकही सभा चुकवली नाही. जागा मिळेल तेथे रात्र काढतो पण सभा चुकवत नाही, असे ते सांगतात.
वानखडे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. यावरून या धम्म मेळाव्यात सहभागी होणाऱ्या जनतेची श्रद्धा आणि प्रेम याची आपल्याला कल्पना येईल. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या प्रगतीचा आणि विज्ञानवादी दृष्टीकोन पटल्यामुळेच वेगवेगळ््या समूहातील जनता बुद्धांच्या मार्गावर येत आहे. आपली ही वाटचाल प्रबुद्ध होण्याच्या दिशेने आहे. त्यामुळे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिस्थितीचे भान देणा-या या धम्म मेळाव्यातून उर्जा घेऊन लाखोंचा जनसागर आपापल्या गावी परतला. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जपणूक करण्याची शपथ घेऊन गावाकडे परतलेली हीच माणसं असतात, जी समाजातील सलोखा, वातावरण सौहार्द ठेवतात. गेल्या ३८ वर्षांपासून ‘अकोला पॅटर्न’ म्हणून सुरू झालेली ही विकासाची ‘प्रकाशवाट’ अकोल्यातून महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागावात पोचावी, हीच सदिच्छा…!
– ऍड. गायत्री कांबळे