पिंपरी-चिंचवड : दिखाऊ खर्चाला फाटा देऊन समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपण्यासाठी, वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष नितीन गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त थेरगाव येथे एका विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रज्ञा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्रज्ञा विद्यामंदिर (गणेश नगर) येथे मोफत आरोग्य तपासणी आणि भव्य रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले.

या उपक्रमांतर्गत शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. केवळ तपासणी करून न थांबता, शहराध्यक्ष नितीन गवळी यांनी एक कौतुकास्पद घोषणा केली. तपासणी दरम्यान कोणत्याही विद्यार्थ्यामध्ये गंभीर (क्रिटिकल) आजार आढळल्यास, त्याच्या पुढील उपचाराचा संपूर्ण खर्च स्वतः शहराध्यक्ष किंवा त्यांच्या कार्यकारिणीमार्फत उचलला जाईल, अशी ठाम ग्वाही त्यांनी यावेळी दिली. त्यांच्या या भूमिकेचे पालकांमधून स्वागत होत आहे.

आरोग्य तपासणीसोबतच शाळेच्या परिसरात रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. स्वतः शहराध्यक्षांच्या हस्ते सर्व रक्तदात्यांना फळ वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती आणि सहकार्यया उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या नियोजनात शाळेचे प्राचार्य, शिक्षकवृंद तसेच शहर संघटक सुनील जावळे आणि त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले.”वाढदिवस हा केवळ उत्सवासाठी नसून तो समाजाच्या उपयोगी पडण्यासाठी असावा, हाच आमचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य हीच आमची प्राथमिकता आहे,” असे मत यावेळी शहराध्यक्ष नितीन गवळी यांनी व्यक्त केले.





