स्वातंत्र्यसैनिक आप्पा मायदेव एक आदरणीय व्यक्तिमत्व, राष्ट्र सेवा दलातील त्यांचे योगदान आणि स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे योगदान मोलाचे होते. ज्येष्ठ गांधीवादी समाजवादी नेते अच्युतराव पटवर्धन यांचे ते सचिव होते. त्यांनी 1942 च्या चळवळीत अनेक कामे केली. त्यापैकी गुप्त पत्रकांचे वाटप करणे, निरोप पोहोचवणे, सत्याग्रहात भाग घेणे, मोर्चे आणि मिरवणूक आयोजित करणे, भूमिगत रेडिओ चालवणे, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, साने गुरुजींनी दिलेले काम अत्यंत चपळाईने करणे, लोकाग्रणी अच्युतराव यांच्यामागे ब्रिटिश सरकार लागले असताना त्यांच्या राहण्याच्या जागा बदलणे, त्यांचे निरोप पोहोचवणे, अच्युतराव यांची शुश्रूषा करणे, डॉक्टरांकडे नेणे या गोष्टी आप्पांनी केल्या. अशी गुणग्राहकता अप्पा कडे होती. आप्पा मायदेवांनी राष्ट्रसेवा दलाला पूर्णवेळ वाहून घेतल्यावर त्यांनी भाई वैद्य, डॉक्टर बाबा आढाव, कृष्णा कापसे, शिवाजी जवळकर , दादा गुजर, सिंधुताई केतकर, गोपाळ शहा, मार्तंड पाटील अशी सेवा दलातील एका पेक्षा एक रत्ने आप्पा नी सेवा दलाशी जोडली . डॉक्टर बाबा आढावांनी हमालांच्या संघटने सोबतच एक गाव – एक पाणवठा, जाती अंताची लढाई असे सामाजिक प्रयोग केले. त्यात आजही ते कुठे कमी नाहीत. मांजरीला सेवा दलाची शिबिरे होत, त्यात आप्पांनी रामभाऊ तुपे, मारुतराव काळे यांच्या सोबतीने डझनभर शिबिरांचे आयोजन केले. अशा आप्पांशी पुष्पाताई च लग्न झाल्यानंतर त्यांना किती मोठा परिवार राष्ट्रसेवा दलाचा लाभला आहे, हे आपण बघू शकतो.
पुणे येथील हडपसरच्या महाराष्ट्र आरोग्य मंडळाची जी कार्यसंस्कृती उभी राहिली त्यात आप्पांचा मोठा वाटा होता. त्यात पुष्पा ताईंनी आरोग्य मंडळाच्या कामाशी अखेरपर्यंत जोडून घेतले होते. आप्पा मायदेवांचे जेव्हा निधन झाले तेव्हा हडपसर येथील साने गुरुजी रूग्णालयाला आप्पा मायदेवांच्या इच्छेनुसार त्यांचे पार्थिव शरीर 2001 मध्ये मेडिकल कॉलेजच्या मुलांच्या अभ्यासासाठी देण्यात आले.
इंदूताई केळकर यांनी राष्ट्र सेवा दलाचे मध्यवर्ती कार्यालय आपल्या आईच्या घरातून चालवण्यास परवानगी दिली होती. त्या कार्यालयाची जबाबदारी आप्पा मायदेवांवर होती. त्यात शिस्त आणि वक्तशीरपणा आप्पांनी मैदानावर आणि कार्यालयातही आणला होता. त्या सर्व जबाबदारी मध्ये पुष्पाताई मायदेवांचा वाटा होता. अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांनी आप्पा मायदेव हे कृषी पदवीधर असल्यामुळे हडपसर मांजरी येथील सुभाष सामुदायिक सहकारी सोसायटीची जबाबदारी आप्पांवर देण्यात आली. आप्पांनी संधीचं सोनं केलं. एक दशक अथक श्रम केल्यावर त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पाहुणे येऊ लागले. आप्पांच्या कामाची दखल सरकार दरबारी घेतली गेली. पुष्पाताई मायदेवांनी दोन मुलींचा सांभाळ करत असताना आप्पांना त्यांच्या मांजरी येथील सुभाष सोसायटीच्या कामात जमेल तशी मदत केली. आप्पांचा 80 वा वाढदिवस त्यांच्या जुन्या-नव्या सहकारी मित्रांनी आयोजित केला होता त्यावेळी पुष्पा ताईंच्या कार्याचाही अनेकांनी गौरवाने उल्लेख केला होता . आप्पांना त्यांनी खूप साथ दिली. मुलांवरचे संस्कारात कमी पडू दिले नाही. 1987 ला आप्पा मुंबईच्या साने गुरुजी विद्यालयात प्रकाशभाई मोहाडीकरां सोबत दिसले त्यावेळी मी प्रथम आप्पा मायदेव आणि पुष्पाताई मायदेव यांना पाहिले होते. क्षीरसागर सर, डेंगळे गुरुजी, म्हात्रे सर हे सर्व सेवादलाचे कार्यकर्ते त्या शिबिराला हजर होते. पुढे जाऊन बाळासाहेब आंबेडकर यांचा आप्पा मायदेव आणि पुष्पाताई मायदेव यांच्या धाकट्या मुलीशी म्हणजे प्रा. अंजली ताई यांच्याशी विवाह झाला. तो आंतरजातीय विवाह होता. हा वैचारिक पातळीवर जुळलेला विवाह होता. दोन्ही कुटुंब समतेची लढाई लढणारे होते. पण, बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते, बामसेफचे वामन मेश्राम यांनी अत्यंत खालच्या पातळीवर प्रचार केला की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, प्रमोद महाजन यांच्या नात्यात बाळासाहेब आंबेडकर यांची सोयरीक जुळली आहे. महाजन काय किंवा संघ काय.. या प्रवृत्तींशी दोन हात करण्यात आप्पा मायदेव आणि पुष्पा मायदेव यांनी लढाई लढली. पुढे सुजात आंबेडकर यांचा जन्म झाला त्यावेळी त्याची मुंज केली अशी वदंता या मंडळींनी पसरवली. त्यावेळी आप्पा आणि पुष्पा ताईंना मोठा मानसिक क्लेश झाला. पुष्पाताई समाजवादी महिला सभा, बायजा, मिळून साऱ्याजणी या पुण्यातील महिला संघटनांमध्ये कार्यरत होत्या . त्या समाजवादी महिला सभेच्या अध्यक्ष होत्या. आणि साधना साप्ताहिकात स्त्रियांच्या प्रश्नांवर लिखाण करीत होत्या. त्या कुटुंबासाठी झटल्या, समाजासाठी झगडल्या. शेवटी सानेगुरुजी म्हणाले होते, आपल्याला जग कवटाळाव असे वाटते; पण प्रत्येकाने आपल्या कवेत मावेल एवढे जग जरी कवटाळले आणि कार्य केले तरी भरपूर.
डेक्कन च्या घरातील, आणि पाटील हेरिटेजच्या त्यांच्या सहवासातल्या त्यांच्याबद्दलच्या माझ्या खूप स्मृती आहेत. 1950 ते 1985 या काळातील समाजवादी चळवळीतील भारदस्त असं नाव होतं आप्पा मायदेवांचं. ज्येष्ठ समाजवादी नेते बापूसाहेब काळदाते यांच्याशी अप्पा मायदेव यांचे नातेसंबंध होते. परंतु, आप्पा मायदेव आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब चळवळीमध्ये अतिशय नम्रपणे काम करत राहिले.
वृद्धापकाळाने आज पुष्पा ताई यांचे पुण्यात निधन झालं. परवा प्रा. अंजलीताई आंबेडकर मुंबईत आल्या होत्या, पण; बैठक संपल्यावर तत्काळ पुण्याला निघाल्या. मला म्हणाल्या, आई आजारी असल्यामुळे मी सहसा बाहेर पडत नाही. त्यांच्या बोलण्यातून आईच्या प्रकृतीची चिंता जाणवत होती आणि आज ही बातमी…
पुष्पा ताईंचा हसतमुख चेहरा कधीच विस्मृतीत जाणार नाही. त्यांच्या आठवणीने मन गळबळून येते. सम्यक विद्यार्थी आंदोलन तर्फे माझी त्यांना भावपूर्ण आदरांजली..!!
महेश भारतीय