पुणे : पुण्यातील एका सजग मतदाराने आपल्या घराबाहेर लावलेल्या एका ‘पुणेरी पाटी’ने सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांना नो एन्ट्री केली आहे. निवडणुकीच्या काळात अनेकदा मतदारांना विविध आश्वासने दिली जातात किंवा वैयक्तिक भेटीगाठी घेतल्या जातात.
मात्र, या घरातील मतदारांनी आपण वंचित बहुजन आघाडीचे कट्टर समर्थक असल्याचे जाहीर करून, इतर कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला घराचा उंबरठा ओलांडू न देण्याचे संकेत दिले आहेत. “उमेदवारांनी आपला वेळ आणि कागद वाया घालवू नये,” असा स्पष्ट इशाराच या पाटीद्वारे देण्यात आला आहे.
नेमका मजकूर काय?
पुण्यातील एका घरावर लावलेली ही पाटी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “या घरातील सर्व मतदार हे आद. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे असून, उमेदवारांनी विनवणी करून आपला बहुमूल्य वेळ आणि पत्रके वाटून आपला खर्च वाया घालवू नये.
पुणेरी शैलीत ‘राजकीय भूमिका’
पुणेरी पाट्या या सहसा दुपारची झोप, पार्किंग किंवा कचरा टाकण्यावरून असतात. मात्र, यावेळी मतदाराने आपली राजकीय विचारधारा जाहीर करण्यासाठी या माध्यमाचा वापर केला आहे. “आम्ही आमचे मत निश्चित केले आहे, त्यामुळे उगाच विनवणी करून वेळ वाया घालवू नका,” असा संदेश दिला आहे.






