भारतीय इतिहासामध्ये अनेक प्रबोधनकार, स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले. त्यापैकी काही लोकांची माहिती आपल्यासमोर विविध माध्यमाद्वारे आली आहे. तर काही लोकांची आलेली नाही; पण ती माहिती जरी समोर आलेली नसली, तरी त्यांनी केलेल्या कामाचे महत्त्व अजिबात कमी होत नाही. तरीपण अशा पडद्याआड गेलेल्या व्यक्तींची माहिती संशोधनासाठी आजच्या तरुण पिढीला समजणे फार आवश्यक आहे. कारण, तो एक प्रकारचा दस्तऐवज असतो. ही अडचण लक्षात आल्यामुळे आणि सामाजिक बांधिलकी विचारात घेऊन अशा विस्मृतीत गेलेल्या लोकांना आपल्या समोर आणण्याचे अवघड व किचकट काम अगदी साध्या, सरळ सोप्या भाषेत प्रा. डॉ. शरद गायकवाड यांनी’ प्रबोधन चळवळीतील मातंगांची शौर्यगाथा’ या पुस्तकाच्या माध्यमातून आणले आहे. या पुस्तकामध्ये एकूण बावीस व्यक्तींवर त्यांच्या कार्यकर्तृत्वावर माहिती देणारे लिखाण झालेले आहे.
महानायक क्रांती योद्धा फकिरा राणोजी मांग यांच्या वरील लेख वाचल्यानंतर मी तर त्यांना रॉबिन हूड हीच पदवी बहाल करेल. त्या काळात गरिबांना यांचा मोठा सहारा वाटत होता, त्यांनी स्वतःच्या मरणा बाबत केलेले वक्तव्य तर फारच प्रेरणादायी वाटते. ब्रिटिश राजवटीने काही जमातींना गुन्हेगारी जमात म्हणून घोषित केले होते. त्याचा कायदा कसा होत गेला. हजेरी पद्धत म्हणजे काय? फकीरा रामोजी मांग यांनी यावर आपला कसा विरोध दर्शवला, ही उपयुक्त माहिती पुस्तकात वाचायला मिळते. त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात बंड केले होते म्हणून मी त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणेल.
आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मार्केटिंगला खूप महत्त्वाचे स्थान लाभले आहे. त्याला कला हे क्षेत्र सुद्धा अपवाद राहिलेले नाही. लावणी, नाटक ,गायन, संगीत याचे मूळ निर्माते आम्हीच आहोत, हे भासवण्यासाठी गळचेपी स्पर्धा चालू आहे. त्यासाठी विविध वाहिन्यांवर इंडियन आयडॉल, डान्स स्पर्धा यांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केलं जातं. आम्हीच खरे कलाकार आहोत, हे दाखवण्यासाठी चढाओढ चालू आहे; पण या पुस्तकातील आद्य वगसम्राट उमाजी बापू सावळजकर आणि कलारत्न तमाशा सम्राट तात्यासाहेब सावळजकर हे प्रकरण जर आपण वाचले, तर आपल्या लक्षात नक्की येईल की, कला क्षेत्राची मूळ निर्मिती कोणाची आहे आणि मोठ्या प्रमाणात उचलेगिरी कोण करत आहे.
शाहू शिष्य,पहिले मातंग खासदार ऍड. आप्पासाहेब मोरे या प्रकरणांमध्ये राजर्षी शाहूंनी मातंग समाजासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख वाचायला मिळतो. शाहू महाराज हे बोलणारे नाही तर कृतिशील राजे होते. ते शिक्षणाप्रती एवढे जागरूक आणि आग्रही का होते, हे प्रकरण वाचताना आपल्याला पदोपदी जाणवते. त्याचबरोबर या प्रकरणांमध्ये आप्पासाहेब मोरे यांचे सामाजिक आणि राजकीय कार्यावर सविस्तर लिखाण केलेले आहे. खासदारांनी कामे कशी करावीत याचे उत्तम उदाहरण म्हणून आप्पासाहेब मोरे यांच्या कारकिर्दीकडे पाहता येईल.
1962 साली भारतावर चीन देशाने जेव्हा आक्रमण केले तेव्हा हिमालयाच्या सीमेवर भारताचा दारुण पराभव झाला होता. यावेळी हिमालयाच्या मदतीला सह्याद्रीचा सिंह म्हणजे यशवंतराव चव्हाण यांनाच संरक्षण मंत्री करण्यासाठी पंतप्रधान नेहरूंकडे खासदार मोरे यांनी शिफारस केली व पुढे यशवंतराव चव्हाण हेच संरक्षणमंत्री झाले अशी माहिती मोरे यांच्या वारसदारांकडून मिळाली आहे, असे लेखकाने पुस्तकात नमूद केले आहे. ही व अशी बरीच नवीन माहिती माझ्या तरी पहिल्यांदाच वाचण्यात आली आहे.
गोविंद बाबाजी भिंगार दिवे यांचे पुस्तकातील प्रकरण मला विशेष आवडले आहे. यामध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती तर दिलेलीच आहे; पण त्याचबरोबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केल्यानंतर या भूमिकेचे समर्थन करण्यासाठी मुंबई येथील दादर परिसरातील नायगाव येथील बी.डी.डी शाळेच्या मैदानावर मातंग समाजाची एक परिषद संपन्न झाली होती ही परिषद भरविण्यात गोविंद बाबाजी भिंगारदिवे यांचा खूप महत्त्वाचा वाटा होता. जे लोक जाती – जातीमध्ये द्वेष पसरविण्याचा किंवा लोकांच्या भावना भडकविण्याचे काम करतात, त्यांनी असे कृत्य करण्या अगोदर चळवळीचा सखोल अभ्यास करावा. चळवळ नेमके कशाला म्हणतात ? समाजकारण आणि राजकारण यांचा ताळमेळ कसा साधावा, यासाठी हे प्रकरण नक्कीच आपल्याला मार्गदर्शन करते.
जे लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना एका जातीपुरते मर्यादित करू पाहतात, आम्हीच बाबासाहेबांचे खरे वारसदार आहोत, असे सांगत सुटतात. त्यांनी आरपार आंबेडकरवादी केरबा जाधव हे प्रकरण वाचावे.
लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांची ओळख साऱ्या जगाला आहे; पण त्यांचे कनिष्ठ बंधू शंकर भाऊ साठे यांना मात्र फार कमी लोक ओळखत असावेत. त्यांची परिपूर्ण ओळख करून देण्याचे काम लेखकाने या पुस्तकातील अण्णा भाऊंचे चरित्रकार शंकर भाऊ साठे या प्रकरणाद्वारे केली आहे. त्यांनी कोणकोणते साहित्य प्रकाशित केले, अण्णा भाऊ साठे आणि शंकर भाऊ साठे या भावांचे कसे जिव्हाळ्याचे संबंध होते त्याचाही आढावा या पुस्तकात घेतला गेला आहे. पुस्तक अधिक संशोधनपर व्हावे, यासाठी लेखकाने काही दुर्मीळ आणि महत्त्वपूर्ण मुलाखती घेतल्या आहेत, त्या कोणाच्या व कधी घेतल्या हे वाचल्यानंतर जाणवते की, सदर पुस्तक अचूक होण्यासाठी लेखकाने खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे या पुस्तकाला संदर्भमूल्य प्राप्त झालेले आहे असे मी मानतो.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला मातंग समाजातील लोकांनी जे काही सहकार्य केले त्याची माहिती पुस्तकात दिली आहे. ज्यांच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मातंग समाजाबाबत काही गैरसमज असतील, त्यांनी कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता एक तटस्थ व्यक्ती म्हणून हे पुस्तक एकदा तरी जरूर वाचावे त्यांचे काही गैरसमज नक्कीच दूर होतील एवढी ताकद या पुस्तकाची आहे.
सदर पुस्तकामध्ये स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, चित्रकार, अभिनेता असे विविध पैलू असलेल्या व्यक्तींची ओळख यामध्ये होते. मातंग समाजाचा अभ्यास करण्यासाठी, संशोधनासाठी या पुस्तकाचा आधार घ्यावाच लागेल. मला व्यक्तिगत या पुस्तकामध्ये एकच उणीव जाणवली ती म्हणजे या बावीस व्यक्तींमध्ये एकही महिलेचा समावेश नाही. तरीपण शेवटी मी एवढेच म्हणेन की, प्रत्येकाच्या संग्रही हे पुस्तक असावे.
पुस्तकाचे नाव : प्रबोधन चळवळीतील मातंगांची शौर्यगाथा
लेखक : प्रा. डॉ. शरद गायकवाड
प्रकाशक : नाग नालंदा प्रकाशन इस्लामपूर
पाने : 208
किंमत : 230 रुपये मात्र.
सुशील शिवाजी म्हसदे
मो. 9921241024