वंचित बहुजन आघाडीचे ट्विट
अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या १९ मार्चला झालेल्या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काॅंगेसविषयी महत्वाचं विधान केलं होतं. त्यालाच पुष्टी जोडत आज वंचित बहुजन आघाडीने एक्स हॅंडलवर एक पोस्ट केली आहे. त्यात वंचितने म्हटले आहे की, धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन करण्यासाठी काँग्रेसने यापूर्वी दोनदा अकोला लोकसभा मतदारसंघात बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात मुस्लिम उमेदवार उभा केला होता. या वेळी अकोल्यात काँग्रेसने बाळासाहेबांच्या विरोधात मुस्लिम उमेदवार उभा केला, तर काँग्रेसला देशभरातून पाठिंबा मिळणार नाही. कारण बाळासाहेब निवडून येऊन संसदेत जावेत अशी काँग्रेसची इच्छा नाही हे लोकांच्या लक्षात येईल, असे वंचितने म्हटले आहे.
त्यापूर्वी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातील पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले होते की, काँग्रेसमध्ये आणि इतर पक्षातील मुस्लीम समाजातील लोकांनी काँग्रेसला सांगितलं आहे की, प्रकाश आंबेडकर यांना विरोध करणाऱ्या राजकारणामुळे आणि दोन वेळा मुस्लीम उमेदवार दिल्यामुळे देशभरात काँग्रेसचा जनाधार पुन्हा कमी होणार आहे. यावेळी पुन्हा तुम्ही हा खेळ केला, तर काँग्रेस पक्ष जो आम्हाला जवळचा वाटतो त्याचा स्तर आणखी खाली गेल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा काँग्रेसमधील मुस्लीम आणि जनरल मुस्लीम यांनी काँग्रेसला दिल्याचे म्हटले आहे.