मुंबई : ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी निधन झाले. ‘महाभारत’ मालिकेत ‘कर्ण’ची भूमिका साकारून चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या या अभिनेत्याने 14 ऑक्टोबरच्या मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. गेल्या बऱ्याच काळापासून पंकज धीर हे कर्करोगाशी झुंज देत होते.
त्यांच्या निधनामुळे टेलिव्हिजन आणि चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक चाहते आणि कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे या लोकप्रिय अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
कर्णाची भूमिका ठरली ‘टर्निंग पॉईंट’
पंकज धीर यांना, 1988 मध्ये बी.आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेतील ‘कर्ण’ या भूमिकेमुळे त्यांना तुफान प्रसिद्धी मिळाली. या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आणि आजही त्यांची ‘कर्णाची’ प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.
‘महाभारत’नंतर त्यांनी ‘चंद्रकांता’, ‘युग’, ‘ग्रेट मराठा’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये आणि अनेक सिनेमांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
अभिनयाच्या या प्रवासात पंकज धीर यांनी मोठी कमाई केली. एका माहितीनुसार, ते एका एपिसोडसाठी जवळपास 60 हजार रुपये मानधन घेत होते. त्यांच्या कामामध्ये ‘साधक’, ‘बादशाह’, ‘सोल्जर्स’ यांसारख्या चित्रपटांमधील छोट्या पण प्रभावी भूमिकांचा समावेश आहे.