सोलापूर: अक्कलकोट तालुक्यातील पाझर तलाव आणि साठवण तलावांच्या दुरुस्तीसाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी बोगस पद्धतीने खर्च करून निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांना स्मरणपत्र देऊन तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
अक्कलकोट तालुक्यातील चिक्केहळ्ळी, उडगी आणि संगोळगी येथील साठवण तलावांच्या दुरुस्तीसाठी मोठा निधी उपलब्ध झाला होता. मात्र, हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून, तलाव पूर्ण भरण्यापूर्वीच त्यांना भेगा पडल्या आहेत. चिक्केहळ्ळी येथील तलावाच्या भिंतीला १९ सप्टेंबर रोजी मोठे भगदाड पडले. हे लपवण्यासाठी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सांडवा फोडून पाणी सोडून देण्यात आले, ज्यामुळे खालच्या गावांतील शेतकऱ्यांच्या पिकांचे, विहिरींचे आणि पाइपलाइनचे अतोनात नुकसान झाले आहे. (Vanchit bahujan aghadi)
उडगी येथे पाझर तलावाचे साठवण तलावात रूपांतर करण्याचे काम सुरू असताना, १७ जानेवारी २०२५ रोजी ग्रामस्थांना कोणतीही पूर्वसूचना न देता रातोरात तलावाचा बांध फोडण्यात आला. केवळ बोगस बिले उचलण्यासाठी घाईघाईने तीन महिन्यांत हे काम उरकले असून, सध्या या तलावाच्या बांधालाही भेगा पडल्या आहेत.
प्रशासनाचे दुर्लक्ष आणि इशारा
या भ्रष्टाचाराबाबत वंचित बहुजन आघाडीने १० ऑक्टोबर २०२५ रोजी सर्वप्रथम निवेदन दिले होते. मात्र, चार-पाच महिने उलटूनही प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मढीखांबे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा स्मरणपत्र देण्यात आले. जर तात्काळ चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई केली नाही, तर सोलापूर जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. (Vanchit bahujan aghadi)
यावेळी अक्कलकोट तालुकाध्यक्ष विशाल ठोंबरे, सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्य प्रतिनिधी रविराज पोटे, वंचितचे नेते यशवंत इंगळे, तालुका महासचिव नितीन शिवशरण, आकाश इंगळे, राजकुमार वाघमारे यांसह अनेक कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






