Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home सामाजिक

मराठी गझलेमधली सामाजिक जाणीव

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 4, 2021
in सामाजिक
0
मराठी गझलेमधली सामाजिक जाणीव
0
SHARES
133
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       


 फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप सारख्या समाजमाध्यमांमुळे अभिव्यक्तीचा परीघ विस्तारला आहे. कवी आणि वाचक या दोघांमधे दुवा साधण्याचे काम ही समाजमाध्यमे करीत आहेत. पण या माध्यमांमुळे लाइक आणि कमेंट्सच्या जाळ्यात अनेक कवी-गझलकार अडकलेले दिसतात. त्यामुळे कविता असो की गझल हे एक प्रसिद्धीचे माध्यम बनत चालले आहे. पण खरं म्हणजे कविता लिहिणे हे एक व्रत आहे. सवंग प्रसिद्धीसाठी यमक किंवा गझलेतील रदीफ-काफिये जोडून नुसतेच पांढऱ्याचे काळे करणे म्हणजे कविता नव्हे. पण सोशल मिडियाच्या फुगवटाधारी काळातही व्रतस्थपणे लेखन करत आपल्या कविता-गझलांमधून सामाजिक बांधिलकी जपणारे कवी-गझलकार आजही अस्तित्वात आहेत.
 

       कविता-गझल हे स्वतःला व्यक्त करण्याचं एक साधन आहे. आपल्या मनात खोलवर असलेल्या नेणिवेच्या गुहेत दैनंदिन जीवनातल्या सर्व बारीक-सारीक गोष्टी साठवून ठेवलेल्या असतात. त्याची आपल्याला यत्किंचितही जाणीव नसते. जाणिवेच्या पातळीवर त्या गोष्टी कधीही समोर येत नाहीत. पण मनात अशा गोष्टींची गर्दी वाढली की त्या बाहेर पडण्यासाठी माध्यम शोधत असतात. जगताना झालेल्या जखमा, दुःख, वेदना, इच्छा, अपेक्षा यांना तर जास्त काळ मनातच साठवून ठेवताच येत नाही. अशा गोष्टी जर मनात साठवून ठेवल्या तर त्या भयावह स्वरूपात बाहेर पडू शकतात. आपल्या वेदनांना वाट करून देण्याचे एक प्रभावी माध्यम म्हणजे गझल! गझल नेणिवेच्या दाराचा पासवर्डच असते! ती जाणिवेतला आणि नेणिवेतला दुवा बनून माणसाला जुनं सर्व काही विसरून नव्यानं जगायला शिकवते, आपल्या दुःखातून बाहेर पडून इतरांच्या दुःखात सहभागी व्हायला शिकवते. म्हणूनच सुरेश भट म्हणतात –

माणसांचे दु:ख माझे बनत आहे
सोसतांना मी नव्याने घडत आहे.
..

         गझलेच्या शेरात माणसाचे खरेखुरे जगणे चित्रित होणे अपेक्षित असते. मुळात चांगल्या कवितेची ही पहिली कसोटी आहे की ती माणसाचे जगणे मांडणारी असावी. ‘पोएटीक लिबर्टी’च्या नावाखाली हाडाच्या वाचकालाही न समजणारे अनाकलनीय, अतार्किक लिहीत राहणे म्हणजे कविता नाही. कविता जेव्हा वाचकाला आपलीशी वाटू लागते, आपल्या भावना व्यक्त करणारी वाटते तेव्हा तिचे स्वरूप वैश्विक झालेले असते. तुकारामांचे अभंग किंवा कबीराचे दोहे आजही लोकांना तोंडपाठ आहेत. त्यांच्या काव्यात देश-काल-परिस्थितीच्या सीमा भेदून पुढे जाण्याची शक्ती आहे. याचे कारण म्हणजे त्यांच्या काव्यात माणसांचे जगणे चित्रित झाले आहे. सुप्रसिद्ध शायर बशीर बद्र जेव्हा
 
लोग टूट जाते हैं एक घर बनाने में,
तूम तरस नहीं खाते बस्तिया जलाने में…


   असे म्हणतात, तेव्हा गरीब माणसाला आपली एक छोटीशी झोपडी बांधण्यासाठी कितीतरी हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. बशीर बद्रांसारखा शायर ते सोसणं आपल्या डोळ्यांनी पाहतो. त्या झोपडीला जेव्हा स्वार्थी राजकारणी जाती-धर्माची आग लावून त्यावर आपली पोळी भाजतात तेव्हा सामाजिक भान असलेल्या बशीर बद्रांसारख्या संवेदनशील कविचे मनही जळते. स्वार्थी राजकारणी चेहऱ्यावर कैवारीपणाचा मुखवटा लावून फिरतात, पण त्यांना जनतेचे काहीही घेणेदेणे नसते. म्हणूनच नांदेडचे मारोती मानेमोड म्हणतात –

पेटलेली आग ही पोटात आहे;
भूक माझी का तरी अज्ञात आहे?
न्यायदाते, राज्यकर्ते चोर झाले;
 देश बाकी जायचा कोमात आहे..!


   आजची परिस्थिती पाहता असे वाटते की खरोखरच देश कोमात जायचाच बाकी आहे. दारिद्र्य, बेरोजगारी अशा समस्या सामान्य मानसापुढे आ वासून उभ्या आहेत. राज्यकर्ते बदलतात पण गरिबांची भूक तर आजही अज्ञातच आहे. न्यायव्यवस्था लोकशाहीचा आधारस्तंभ असते असे म्हणतात, पण सत्ता आणि पैशापुढे न्यायदाते सुद्धा लाचार होताना दिसतात. ‘बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो’ असे म्हणणारी बापूंची माकडे कुठे गेलीत? हा प्रश्न पडत राहतो तेव्हा तुळजापूरच्या दास पाटील यांचा शेर आठवतो –
 
कशी बिथरली आज माकडे तुमची बापू ?
जो तो पैशामध्ये गांधी मोजत असतो!


   गांधींच्या विचारांना त्यांच्या अनुयायांनीच केव्हाची मुठमाती दिलेली आहे. पैशापुढे माणुसकी आणि नीतीमत्ता फिकी पडत चालली आहे. आजकाल गांधी फक्त नोटांवर आणि सरकारी कार्यालयांच्या भिंतीवरच उरले आहेत. कोणतंही सरकारी काम म्हटलं की टेबलाखालून पैसे दिल्याशिवाय फाइल पुढे सरकतच नाही. त्यामुळेच देशाच्या विकासाचे तीन तेरा वाजले आहेत. दरवर्षी विकास कामांच्या फायलींचे ढिगारेच्या ढिगारे मंत्रालयात गोळा होतात पण विकास मात्र सापडत नाही. तेव्हा अमरावतीचे नितीन भट म्हणतात –  

या देशाचा विकास होता होता…
सरकारी फायलीत अडला आहे !


        देशाचा विकास जसा सरकारी फायलीत अडकला आहे, तसाच तो समाजात पसरलेल्या अनेक अंधश्रद्धांमुळे सुद्धा अडला आहे. गाडगेबाबांसारख्या संतांनी समाजात पसरलेल्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च केले परंतु लोकांच्या डोक्यातला कचरा मात्र काही केल्या साफ होत नाही. देशाच्या संविधानाने प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. प्रत्येकाने आपाआपल्या धर्माची उपासना करावी पण लोक धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अंधश्रद्धांना आज मुठमाती देणे आवश्यक झाले आहे. हीच गोष्ट धरणगावचे ज्ञानेश पाटील अत्यंत वेगळ्या पद्धतीने मांडतात –

थेट लोटांगण अताशा घेत नाही मी,
खरवडूनी पाहतो शेंदूर थोडासा…

   खरं तर बुरसटलेल्या विचारसरणींचा मनावर साचलेला शेंदूर काढणे काळाची गरज आहे. ज्ञानेश पाटलांच्या शेराला आशयाचे आणखीही अनेक पदर आहेत. तुर्तास एकाच अनुषंगाने या शेराचा विचार केला आहे. लोटांगण घालण्याआधी ज्ञानेश पाटलांसारख्या लोकांना शेंदूरामागे लपलेला देव एकदा तपासून पहावासा वाटतो. दुसरीकडे मात्र मंदीरांसमोर दर्शनासाठी कित्येक किलोमीटर पसरलेल्या रांगाच्या रांगा दिसतात. अकोल्याच्या अरविंद पोहरकरांनाही एक वेगळा साक्षात्कार झालेला दिसतो. ते म्हणतात –  

दर्शनाला मंदिराची पायरी मी चढत नाही
मी सकाळी लेकराचा चेहरा पाहून घेतो !


   पोहरकरांना लेकराच्या निरागस चेहऱ्यातच देव दिसतो. पण आजकाल लोकांची मेंढरांसारखी अवस्था झाली आहे. डोक्यातला विचार करण्याऱ्या पेशीच निकामी झाल्यात की काय असे वाटते. हजारो मेसेज रोज विचार न करता ‘व्हायरल’ केले जातात. आपण काय फॉरवर्ड करतो याचा तीळमात्र विचार कोणी करताना दिसत नाही. कधी काळी रेड्याच्या तोंडून ज्ञानेश्वरांनी वेद म्हणवून घेतल्याचे ऐकण्यात आहे. ती गोष्ट आजच्या विज्ञान युगात काही खरी वाटत नाही किंवा दुसरा एखादा रेडा पुन्हा बोलल्याचे सुद्धा कधी कोणी पाहिले नाही पण ज्ञानेश्वरांचा हेला समाधीतून निघून दुध द्यायला लागला आहे, असा मेसेजही कोणी कधी पाठवला तर आगीसारखा व्हायरल होऊ शकतो अशी आजची परिस्थिती आहे. सासवडचे शुभानन चिंचकर हीच गोष्ट आपल्या शेरातून मांडतात –    

व्हायरल झालाय हा मेसेज रातोरात येथे,
की नव्या ज्ञानेश्वरांचा देत आहे दूध हेला !


  पण ही गोष्ट कोणाच्याच लक्षात येत नाही. आणि कुणाला काही समाजावून सांगणे हा आजकालच्या काळात मोठा गुन्हा आहे. चुकून व्हायरल झालेल्या पोस्टवर कोणी विरोधातली कमेंट केली रे केली अंधभक्त लगेच गोळा होतात. शिवीगाळ करू लागतात. नको तिथे संवेदनशीलता दाखवली जाते. तेव्हा नागपूरच्या अनंत नांदूरकर ‘खलिश’ यांचा शेर आठवतो –  

जसे आभाळ कोसळते सशावर पानही पडता,
तशा संवेदना झाल्या कुणी काही जरा म्हणता !


       जुन्या सशाच्या अंगावर आभाळ पडण्याच्या गोष्टीपेक्षा फार वेगळी गोष्ट आजकाल घडत आहे. आजकालच्या गोष्टीतल्या सशाच्या अंगावर पान पडते. त्यालाही वाटते आभाळ कोसळत आहे. तोही सुसाट पळत सुटतो. आभाळ कोसळल्याचा मेसेज सर्व जंगलात ‘व्हायरल’ करतो. आजकालचे इतर प्राणीही त्याच्यामागे विचार न करता धावत सुटतात. जुन्या सशाच्या गोष्टीत एखाद्या विचारी प्राण्याने आभाळ कुठे कोसळले आहे? हे विचारले तर सर्वप्राणी त्याचा विचार करायचे. आज मात्र परीस्थीती फार विचित्र आहे. आजकाल दात ओठ खाऊन त्या बिचाऱ्या विचारी प्राण्यालाच जीव जाईस्तोवर मारायची पद्धत सुरू झाली आहे, असे सगळीकडे चालले आहे.
  मराठी गझलेत अनेक गझलकार आपल्या गझलेतून समाजातले अनेक प्रश्न हाताळताना दिसतात. अनेक गझलकार स्त्रीयांची व्यथा आपल्या शेरांमधून मांडतात. जन्म होण्याआधी पासूनच एका स्रीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अकोल्याचे अमित वाघ लिहितात –

बदलू कसे स्वतःचे गर्भात लिंग आई?
निष्पाप अर्भकाचा साधा सवाल होता
!

   आज भारतातले लिंग-गुणोत्तर पाहिले असता वंशाला दिवा हवा म्हणून मुलगा हवा असतो. हाच मुलगा पुढे आई-बापाला वृद्धाश्रमात पाठवतो. जन्म होण्याआधीच गर्भावर अपेक्षांचे ओझे लादले जाते. अमित वाघांचा स्त्रीगर्भाची व्यथा मांडणारा उपरोक्त शेर खूपच ह्रदयस्पर्शी आहे. मरेपर्यंत तिची व्यथा काही केल्या संपत नाही. रविवार असो की एखादा सण असो तिला मात्र कधीच सुट्टी नसते. आयुष्यभर राबून ती आपल्या संसाराला सांधत असते –
 
पूर्ण जगाला सुट्टी आहे पण ती अजुनी राबत आहे,
रांधत आहे, वाढत आहे, आयुष्याला सांधत आहे !

   नांदेडच्या संजयकुमार बामणीकर यांचा हा शेर तिची व्यथा अचूकपणे मांडतो. समाजातले प्रश्न देखील अनेक गझलकार आपल्या गझलेत मांडताना दिसतात. गझलेचा प्रसार प्रचार गावखेड्यापर्यंत होत आहे. अनेक लोक गझल लेखनाकडे वळत आहेत. आज सोशल मिडियामुळे लेखनावर कोणाचीही मक्तेदारी राहिलेली नाही. आशयाची तीच ती आवर्तने टाळली गेली आणि माणसाचे खरेखुरे जगणे गझलेत आले तर निश्चितच मराठी गझल सुद्धा मराठी भाषेचे अस्तित्व आहे तोपर्यंत जिवंत राहू शकेल. गझलकार आणि ज्यांच्याविषयी, ज्यांच्यासाठी गझल लिहिली जात आहे, त्यांच्या भाषेत जोपर्यंत ती लिहिली जात नाही तोपर्यंत मराठी गझल वाचकाभिमुख होणार नाही. आपल्या काव्यातील संवेदना व सामाजिक मूल्य वेळोवेळी तपासत राहणे, हे कुठल्याही काळात लिहिणाऱ्या कवी-गझलकाराचे नैतिक कर्तव्य असले पाहिजे. हे कर्तव्य अनेक गझलकार पार पाडताना देखील दिसतात. त्यामुळे मराठी गझलेचे भवितव्य उज्वल आहे.

अमोल शिरसाट

लेखक मराठी गझलकार व गझल अभ्यासक आहेत.


       
Tags: amolshirsatmarathigazal
Previous Post

‘वंचितच्या’ राजकीय चमत्काराचे सिंहावलोकन

Next Post

वीज मीटर कापून नेणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांचा सत्कार करुन ‘वंबआ’च्या वतीने अनोखे आंदोलन

Next Post
वीज मीटर कापून नेणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांचा सत्कार करुन ‘वंबआ’च्या वतीने  अनोखे आंदोलन

वीज मीटर कापून नेणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांचा सत्कार करुन 'वंबआ'च्या वतीने अनोखे आंदोलन

तरुणांनो चळवळ समजून घेतांना…..
राजकीय

तरुणांनो चळवळ समजून घेतांना…..

फुलांशी खेळण्याच्या वयात मी निखाऱ्यांशी खेळतोय,मोकळ्या हवेत बागडणाऱ्या वयात मी कारावास भोगतोय !ज.वी. पवार नुकत्याच नांदेड शहरात पार पडलेल्या दलित ...

June 29, 2022
महिला आरक्षणाच्या निमित्ताने…!
राजकीय

महिला आरक्षणाच्या निमित्ताने…!

राज्यात नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात आरक्षण जाहीर झालं आहे. ह्यात महिला राखीव सोडतीत महिलांच्या जागांचा टक्का वाढताना दिसतोय. ...

June 29, 2022
शाहू महाराजांनी वंचितांसाठी उघडले शिक्षणाचे महाद्वार !
सामाजिक

शाहू महाराजांनी वंचितांसाठी उघडले शिक्षणाचे महाद्वार !

राजर्षी शाहू महाराज (१८७६-१९२२) हे भारतीय रियासत कोल्हापूरचे राजे होते. ते त्यांच्या काळातील थोर समाजसुधारक म्हणून ओळखले जात. शाहू महाराज ...

June 26, 2022
बातमी

बंडखोरांना महाराष्ट्रात आल्याशिवाय बंड पूर्ण करता येणार नाही!

ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी काल दि. 24 जून रोजी एबीपी माझा वहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्यघटना, कायदे, आणि कोर्टाच्या निर्णयांच्या आधारावर खालील ...

June 24, 2022
अजित पवार आणि जयंत पाटिल भाजप समर्थनात खोटं बोलतायत?
बातमी

अजित पवार आणि जयंत पाटिल भाजप समर्थनात खोटं बोलतायत?

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मोठी बंडाळी उफाळून आली आहे. शिवसेनेतील या बंडाळी मागे भाजप नसल्याचे व्यक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार ...

June 24, 2022
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक