नवी मुंबई : पावसामुळे दोन तासांच्या विलंबानंतर अखेर नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील महिला वन डे वर्ल्ड कप फायनलला सुरुवात झाली. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
मानधना-शफालीची ऐतिहासिक भागीदारी!
भारतीय संघाला स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी अतिशय आश्वासक सुरुवात करून दिली. स्मृतीची उत्तम साथ मिळाल्याने या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून इतिहास रचला. वर्ल्ड कप फायनलमध्ये शतकी भागीदारी करणारी ही दुसरी सलामीची जोडी ठरली आहे. तसेच पहिल्या पॉवरप्लेमध्येच या जोडीने ६४ धावा चोपल्या! महिला वर्ल्ड कप फायनलमध्ये ५० पेक्षा जास्त धावांची भागीदारी करणारी ही तिसरी जोडी ठरली आहे.
स्मृती मानधनाने या सामन्यात उतरताना भारताची महान फलंदाज मिताली राज हिच्या नावावर असलेला एक मोठा विक्रम मोडला. स्मृतीने या वर्ल्ड कप पर्वात ४१२ हून अधिक धावा करत २०१७ च्या वर्ल्ड कपमध्ये मिताली राजने केलेल्या ४०९ धावांचा विक्रम मोडला. स्मृतीचा हा झंझावात १८व्या षटकात थांबला. क्लोए लूसच्या चेंडूवर कट मारण्याच्या प्रयत्नात ती झेलबाद झाली. स्मृतीने ५८ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ४५ धावा केल्या. तीने शफालीसोबतची १०४ धावांची भागीदारी केली.






