प्रा. अंजलीताई आंबेडकर यांचे आवाहन
तेल्हारा : केंद्र आणि राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात मनमानी चालवली असून, त्यांना दलित, ओबीसी आणि वंचित घटकांचे काही देणे घेणे नाही म्हणून त्यांनी 65 हजार शाळा बंद करण्याचा तुघलकी निर्णय घेतला असा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी केला.
तेल्हारा तालुक्यातील मनब्दा, पाथर्डी, जस्तगाव, भोकर, घोडेगाव, बेलखेड, दानापूर येथे संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. दानापुर येथील संवाद मेळाव्यात प्रा. अंजलीताई आंबेडकर बोलत होत्या.
प्रा. आंबेडकर म्हणाल्या की, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी, आरोग्य आणि महिलांची सुरक्षितता हे प्रश्न उभे आहेत. या प्रश्नावर शासन अजिबात गंभीर नाही. शिक्षणाशिवाय प्रगती नाही, हे जरी खरे असले तरी कमी पटसंख्येच्या नावाखाली या शासनाने ग्रामीण भागातील 65 हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. हा एक प्रकारे दलित, ओबीसी, आदिवासी आणि शेतमजुरांच्या मुलावर अन्याय आहे. 65 हजार शाळांपैकी 23 हजार शाळा आदिवासी भागातील आहेत. आदिवासी लोक शेतात पाड्यावर राहतात. लहान लहान पाड्यामिळून एक समूह बनतो. अशावेळी पटसंख्या कमी असली तरी शासनाने आदिवासींची मुले म्हणून विशेष उपाययोजना करायला पाहिजे. मात्र, तसं न करता शासन शाळा बंद करून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवत आहे, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.
शेतकरी आत्महत्या संदर्भात बोलताना त्या म्हणाल्या की, आत्महत्या थांबवण्यासाठी शेतीला जोडधंदा सुरू करण्याची एक संकल्पना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली होती. त्यांच्या मतानुसार शेतीसोबत जोडधंदा सुरू केला तर शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न वाढेल, आर्थिक सुबत्ता येईल. आणि आत्महत्या होणार नाहीत, ज्या भागामध्ये जे उत्पन्न जास्त पिकते, त्या पिकावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू झाले पाहिजे, हा प्रयोग केल्यास बेरोजगारीचा प्रश्न राहणार नाही. तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल. याबाबतचे सर्व निर्णय संसदेमध्ये होतात म्हणून संसदेमध्ये शेतकऱ्यांची बाजू निर्भीडपणे मांडण्यासाठी कणखर नेतृत्व पाहिजे याची सुद्धा त्यांनी आठवण करून दिली.
संविधानाच्या विषयी बोलताना त्यांनी सांगितले की, या देशातील सर्वांना शिक्षणाचा आणि समानतेचा हक्क संविधानाने दिला. संविधानामुळे आपण आजपर्यंत सुरक्षित होतो. संविधानाने वंचित घटकाचे रक्षण केले, मात्र आता परिस्थिती बदललेली आहे. आता संविधानाचेच रक्षण करण्याची वेळ आपल्यावर आली आहे. संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या भाजप सरकारला धडा शिकवा असे आवाहन अंजलीताई आंबेडकर यांनी केले.
आमिषाला बळी पडू नका…
संसदेमध्ये ठामपणे बाजू मांडून लोकहिताचे प्रश्न मार्गी लावण्याची ताकद ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये आहे. म्हणून कोणाच्याही आमिषाला बळी न पडता जागरूक राहून मतदान करावे, असे आवाहनही प्रा. आंबेडकर यांनी केले.
लोकसभेचे मतदान हा एक उत्सव असला तरी दलित, वंचित, शोषित, कष्टकरी, शेतमजूर, शेतकरी आणि महिला यांच्या अस्तित्वाची आणि भविष्याची ही लढाई आहे, हे मतदारांनी लक्षात ठेवायला पाहिजे, असेही प्रा. आंबेडकर म्हणाल्या.
या वेळी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा परिषद अध्यक्ष संगीताताई आढाऊ ,जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई सिरसाठ, पुष्पाताई इंगळे, शोभाताई शेळके, निलोफर शहा, दीपमाला दामधर, सरपंच सपना वाकोडे, शोभाताई मुळे, तेल्हारा तालुकाध्यक्ष अशोक दरोकार आदी पदाधिकारी उपस्थित होते. या संवाद मेळाव्याला परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.