भारताच्या सामाजिक, धार्मिक जीवनातील एक क्रांतिकारक बदल घडून आणणारे महान समाज सुधारक म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याकडे पाहिले जाते. स्वातंत्र्योत्तर भारतातील समाज क्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले ( जन्म- ११ एप्रिल १८२७, मृत्यू -२८ नोव्हेंबर १८९०) महात्मा फुले यांनी जातीय विषमता, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री पुरुष समानता, सामाजिक न्याय, आंतरजातीय विवाह या कृतिशील कार्याचा पर्यायी समाज व्यवस्थेचा पाया घातला होता. विषमतावादी समाज व्यवस्थेचा प्रचंड विरोध झुगारून भारतीय स्त्री शिक्षणासाठी त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा १८४८ साली आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने पुण्यातील भिडे वाड्यात सुरू केली. आपल्या धर्मपत्नी सावित्रीबाई फुले यांना साक्षर करून त्यांना स्वातंत्र्योत्तर भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेतील शिक्षिका म्हणून नेमल्या. स्त्री शिक्षणाची तळमळ त्यांनी पुढे सुरू ठेवली.
महात्मा फुले म्हणतात, विद्ये विना मती गेली, मतीवीना नीती गेली, नितीविना गती गेली ,गतीविना वित्त गेले.वित्तविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले .या काव्यातून महात्मा फुले शिक्षणाचं महत्त्व पटवून सांगतात. देशातील एकंदरीत सामाजिक गुलामगिरी लक्षात घेता सन १८७३साली आपला ‘गुलामगिरी’ हा ग्रंथ त्यांनी निग्रो चळवळीला अर्पण केला. शिक्षण मोफत सक्तीचे आणि सार्वत्रिक असले पाहिजे अशी मागणी त्यांनी १९ ऑक्टोबर १८८२ रोजी हंटर शिक्षण आयोगासमोर केली होती. महात्मा फुले हे स्त्री -पुरुष समानतेचे समर्थक होते. त्याकाळी विधवांना केशवपन करून विद्रूप केले जाई. महात्मा फुले यांनी याविरुद्ध मोहिम हाती घेतली आणि नाभिकांचा संप घडून आणला हा संप पगार वाढीसाठी नव्हता तर मिळणारी अपमान्सपद वागणूक, माणूसघाणा अनैतिक पैसा आम्हाला नको हे सांगण्यासाठी होता. या संपाची दखल लंडनच्या वृत्तपत्रांनी घेतली. स्वातंत्र्योत्तर भारतातील भारतीय स्त्रियांच्या हक्कासाठीचा हा पहिलाच संघर्ष असावा. बालविवाहास प्रखर विरोध आणि विधवा पुनर्विवाह पाठबळ महात्मा फुले यांनी दिले. मुलीचे लग्नाचे वय ११तर मुलाचे वय १९ वर्ष असल्याशिवाय विवाहास सहमती देऊ नये. अशी मागणी त्यांनी त्यावेळेस इंग्रज प्रशासनाकडे केली होती. सावित्रीबाई फुले यांच्या सहकाऱ्यांने त्यांनी १८६३साली बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. आणि ब्राह्मण पुरुषांचा नाकर्तेपणा बघून त्यांची कोणतीही मदत न घेता ब्राह्मण विधवांची बाळंतपणे खुद्द सावित्रीबाईंनी केली त्यातल्याच एका काशीबाईच्या मुलाला त्यांनी दत्तक घेऊन उच्चशिक्षित डॉक्टर केले त्याचे नाव यशवंत असे होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून सर्वप्रथम १८८० मध्ये शिवजयंती उत्सवाची सर्वप्रथम सुरुवात महात्मा फुले यांनीच केली. छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पहिला पोवाडा महात्मा फुले यांनीच लिहिला. म्हणून त्यांना ‘शिवजयंतीचे जनक’ असेही म्हणतात. समाजातील भेदाभेद विषमता नष्ट होण्यासाठी त्यांनी १८६८आपल्या घरातील पाण्याचा हौद आणि विहीर अस्पृश्य समाजासाठी खुला केला. समाजात जागृती निर्माण व्हावी म्हणून ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड मराठीतील पहिले आधुनिक नाटक ‘तृतीय रत्न’ लिहिले शिवरायांचा पोवाडा लिहिला.
फुले म्हणतात –
जन्मपत्रिका काढणारा तोच , जन्मपत्रिका समजून सांगणारा तोच जन्मपत्रिकेत दोष काढणारा तोच आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दोशावर उपाय सांगणारा पण तोच वा काय धंदा मांडला आहे राव! हा धंदा त्याच्या ज्ञानावर नसून लोकांच्या अज्ञानावर टिकून आहे.
म्हणून महात्मा फुले यांनी सर्व बहुजनांची अस्मिता जागविणारा सत्यशोधक समाज २४ सप्टेंबर १८७३ साली आपल्या फुले वाड्यात स्थापन केला. आणि सत्यशोधक पद्धतीनेच विवाह लावण्यास सुरुवात केली. या पद्धतीचा पहिला विवाह २५ डिसेंबर,१८७३ रोजी सत्यशोधक समाजातर्फे सिताराम जब्बाजी आल्हाट आणि मंजुबाई ज्ञानोबा निंबणकर यांचा लावण्यात आला. पुढे बहुजनांमध्ये ही पद्धत प्रचंड लोकप्रिय झाली. भारताच्या सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरणारे हे महात्मा ज्योतिराव फुले यांचे महान कार्य त्यांची अनुयायी म्हणून आपण मुळातून समजून घेतले पाहिजे. महात्मा फुले यांच्या एकूण समाज कार्यामुळे ते पर्यायी समाज व्यवस्थेचे खरे ‘शिल्पकार’ ठरतात म्हणून त्यांना ११मे,१८१८मध्ये मुंबईतील हजारो कामगारांनी भायखळ्याला एकत्र जमून समाज क्रांतिकारक महात्मा फुले यांना ‘महात्मा’ ही पदवी दिली. सामान्य माणसांनी आपल्या उद्धारकर्त्याला अशी पदवी देऊन सन्मानित करण्याची ही देशातील पहिलीच घटना होती. येथे जनतेकडून ‘महात्मा’ ही पदवी अर्पण करून त्यांचा सत्कार करण्यात आला. अशा या महान समाज क्रांतिकारकास त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या विचाराला व कार्याला कोटी कोटी त्रिवार अभिवादन करतो.
लेखक ,पत्रकार – सिद्धार्थ तायडे
मु. पो. वडनेर भोलजी
ता. नांदुरा
जि. बुलढाणा
मो .न. 9309767388